सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यात पावसाचे कमबॅक झाले आहे. शुक्रवारी रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून, शनिवारी दिवसभर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरू होती; त्यामुळे वीर धरणाचे 9 दरवाजे उघडून 43,083 क्युसेक पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला दि. 25 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे.
जिल्ह्यात पावसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शुक्रवारी रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. शनिवारी सकाळपासून सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होते. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला होता. शनिवारी सकाळी शाळा व महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस शहर व परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची एकच तारांबळ उडाली. दिवसभर अधूनमधून पावसाची उघडझाप सुरू होती. खरीप हंगामातील पिकांना पाऊस पोषक आहे.
पावसामुळे पावसाळी पर्यटनासाठी कास, ठोसेघर, सज्जनगड, बामणोली, चाळकेवाडी, तापोळा, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. हवामान विभागाने रविवारपर्यंत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, वीर धरण 100 टक्के भरले आहे. तसेच पाणी पातळीमध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याने भाटघर व निरा देवघर धरणातून विद्युत गृहाद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडत आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने निरा नदीमध्ये43 हजार 083 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.