

बामणोली : यवतेश्वर घाटातून गणपती खिंडीपर्यंत लावलेल्या रेसमधील एक कार विद्युत पोलवर आदळून अपघात झाला. दिवाळीच्या पहिल्याच अभ्यंगस्नानाला हा अपघात झाल्याने परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. या अपघातात कार पोलवर आदळल्यानंतर तीन पलट्या मारून संरक्षक कठड्याला धडकली.
दिवाळी अभ्यंगस्नानाचा दिवस असल्याने सातारकर गणेश खिंडीतील गणपती दर्शनासाठी जातात. यामध्येच काही तरुण पाच कारमधून यवतेश्वर घाटातून गणपती खिंडीकडे निघाले होते. या सर्वांनी पाचही गाड्यांची रेस लावली होती. ही रेस सुरू असताना पुढे असणाऱ्या एका कार चालकाचा तोल सुटला व गाडी विद्युत पोलवर जावून आदळली. यामध्ये कारने तीन पलट्या मारल्याने कार रस्त्याकडेच्या लोखंडी सुरक्षा कठड्यावर जावून आदळली. यामध्ये चालक जखमी झाला. या घटनेनंतर इतर कार चालक पसार झाले.
या घटनेनंतर सातारा तालुका पोलिस ठाण्याचे हवालदार लक्ष्मण साठे हे घटनास्थळी पोहोचले. मात्र, यावेळी कोणतीही तक्रार नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान, जखमी चालकाचे इतर कार चालक हे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.