फलटण : पोपट मिंड
फलटण शहरातील रस्त्यांची वाट लागली असून, वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यामुळे खड्ड्यात पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. तसेच काही वर्दळीच्या ठिकाणीही दुर्गंधीयुक्त डबक्याचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. शहरात खड्डे जास्त आणि रस्ता कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात रस्त्यांच्या दुरवस्थेचा कहर झाला असून, खड्ड्यांचे शहर म्हणून फलटणचा नावलौकिक वाढवायचा आहे की काय, असा नागरिक सवाल करत आहेत.
समस्यांचे शहर म्हणून फलटण शहरांची ओळख वाढायला लागली आहे. शहरांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यावर पाण्याची डबकी साचली आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर तळ्याचे स्वरूप आल्याचे दिसून येते. नगरपालिकेच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. साचलेल्या पाण्याच्या या डबक्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून, आरोग्याचे गंभीर प्रश्नही निर्माण होऊ शकतात. शहरभर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची छोटी मोठी डबकी तयार झाली आहेत.
या डबक्यातूनच वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. डबक्यातील खराब पाणी पादचार्यांच्या अंगावर उडते. अनेकदा बाचाबाचीचे प्रसंग उभे राहत आहेत. डबक्याचा अंदाज न आल्याने दुचाकीचे अपघातही होत आहेत. शहरातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांचा रस्ता हे काही कळत नाही. दिवसेंदिवस खड्ड्यांचे आकार वाढत चालले आहेत. रस्त्याच्या समस्येकडे नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. नागरिक नगरपालिकेच्या प्रशासकांपर्यंत पोहोचत नाहीत. समस्या सांगितली तर तातडीने त्याचे निराकरण होत नसल्याने येथे समस्यांचा डोंगर वाढत चालला आहे.