

वेलंग : पसरणी गाव हिऱ्यांची खान आहे. या गावात दोन पद्मश्री झाले. पद्मश्री शाहीर साबळे यांचे होणारे स्मृती स्मारक हे संघर्ष, संस्कृती, संस्कारांचे प्रतीक ठरणारी वास्तू होईल. राज्याला अभिमान वाटेल असे त्यांचे स्मारक उभारू. शाहीर साबळे यांच्या कार्र्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्राच्या लोककलेला आणि संस्कृतीला समृद्धी करणारा ठरेल. शाहिरांच्या विचारांचा वारसा आणि वसा जपणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
पसरणी, ता. वाई येथे लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकाच्या कोनशिला अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, राधाबाई साबळे, यशोमती शिंदे, उदयसिंह पाटील-उंडाळकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व दै.‘पुढारी’चे निवासी संपादक हरीश पाटणे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रतापराव पवार, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष विश्वनाथ पवार, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील सोळस्कर, प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, राजाराम निकम, संजय साबळे, महंत सुंदरगिरी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
ना. अजित पवार म्हणाले, लोकशाहीर पद्मश्री कृष्णाराव साबळे यांचे सामाजिक व स्वातंत्र्य संग्रामातील योगदान मोलाचे आहे. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती देशभरात पोहोचवली. त्यांच्या जन्म गावी पसरणी येथे स्मारक उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. शाहीर साबळे यांच्या नावाला शोभेल व महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असे स्मारक उभे करावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
शाहीर साबळे यांनी स्वातंत्र्य संग्रामात, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हैदराबाद मुक्तिसंग्राम अशा विविध चळवळींमध्ये पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती केली. शाहीर साबळे यांना लहानपणापासूनच गाण्यांचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. साने गुरुजी, संत गाडगेबाबा यांच्यासह विविध दिग्गज मंडळींशी त्यांचा संपर्क आला. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. शाहीर साबळे यांचे विचार पुढच्या पिढीला कळावे यासाठी प्रयत्न करावेत.
ना. अजित पवार पुढे म्हणाले, शाहीर साबळे यांचे स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव कार्य ज्यासमोर यावे. त्यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेणारे आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे स्मृतीस्मारक त्यांच्या जन्मभूमीत उभारण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. केवळ भूमिपूजन करून आपण थांबणार नाही, तर या स्मारकाची भव्यदिव्य इमारत पूर्णत्वास नेईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असेही ना. पवार म्हणाले.
यावेळी ना. मकरंद पाटील म्हणाले, पद्मश्री लोकशाहीर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्रात चळवतील योगदान व सामाजिक कार्य विसरता येणार नाही. त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले. शाहीर साबळे यांच्या शाहिरीची दिग्गज मंडळींनी नोंद घेऊन त्यांचे कौतुक केले. राष्ट्रपतींच्याहस्ते शाहीर साबळे यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पसरणी येथील शाहीर साबळे यांच्या स्मारकाला 30 कोटी निधी लागणार आहे. हा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करून शाहीर साबळे यांच्या नावाला साजेल असे स्मारक उभे केले जाईल, असेही ना. पाटील यांनी सांगितले.
यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज व डॉ. प्रकाश खांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. शाहीर साबळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम निकम यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. श्रीधर जगताप यांनी आभार मानले.
कार्यक्रमास संपत महागडे, अनिल सावंत, भैय्या डोंगरे, बाळासाहेब चिरगुटे, यशवंत जमदाडे, विक्रंम वाघ, प्रमोद शिंदे, महादेव मस्कर, चरण गायकवाड, भूषण गायकवाड, शशिकांत पवार, सत्यजित वीर, मनिष भंडारे, मोहन जाधव, मदन भोसले, महेंद्र पुजारी, आप्पा येवले, बाजीराव महांगडे, बद्रीनाथ महांगडे, डॉ मंगेश महांगडे, धनंजय महांगडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.