

सातारा : साताऱ्यातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनामती चौकात शुक्रवारी दुपारी दोन गटात तुंबळ हाणामारी होत राडा झाला. जुन्या भांडणाच्या कारणातून व एकमेकांना खुन्नस दिल्यावरुन वाहने व दुकानाची तोडफोड करत हल्लेखोरांनी अक्षरश: दहशत माजवली. यामध्ये तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हीलमध्ये उपचार सुरु आहेत. शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, युवकांच्या दोन गटात वाद सुरु आहे. अधूनमधून ही धुसफूस सुरु असताना शुक्रवारी त्याला निमित्त मिळाले. एकमेकांकडे खून्नशीने बघितल्याच्या कारणातून वादावादीला सुरुवात झाली. तोपर्यंत दोन्ही गटातील युवक एकमेकांसमोर आले. हत्यारे काढत संशयितांनी एकमेकांवर हल्ला चढवला. यामध्ये दोन युवकांना गंभीर दुखापत झाली.
भरदुपारी व वर्दळीच्या ठिकाणी ही घटना सुरु झाल्यानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी हल्लेखोरांनी वाहनांना टार्गेट दुचाकीची तोडफोड केली. तसेच परिसरात एका दुकानाचीही तोडफोड केली. मनामती चौकातील या राड्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत जमाव पांगला होता. पोलिसांनी प्राथमिक माहिती घेवून तत्काळ काही युवकांना ताब्यात घेतले.