

खंडाळा : विस्ताराने मोठा आणि भौगोलिकदृष्ट्या विभिन्न असलेल्या वाई मतदार संघात सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू ठेऊन गत 20 वर्षे काम केले. या काळात बरेच काही झाले असले तरी अजून खूप काही करायचे आहे. संपूर्ण तालुक्याला वरदान ठरणार्या उपसा सिंचन योजनांचे टेंडर येत्या काही महिन्यात निघेल. पश्चिम भागातील 14 गावे शेतीच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्याबाबत माझ्याही अनेक बैठका झाल्या आहेत. खंडाळ्याच्या वाट्याचे पाणी कुठेही जाणार नाही. वंचित 14 गावांना निरा- देवघर सिंचन प्रकल्पातून पाणी देणार म्हणजे देणारच हा या मकरंद पाटलाचा शब्द आहे, अशा शब्दात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी असवली येथील नागरी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ग्वाही दिली.
असवली, ता. खंडाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ना. मकरंद पाटील यांची मंत्रिपदी, नितीनकाका पाटील यांची राज्यसभा खासदारपदी वर्णी लागल्याबद्दल, खंडाळा तालुक्याचे सुपुत्र हरीष पाटणे यांची महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल व ज्ञानदीपचे चेअरमन जिजाबा पवार यांचा सरकारच्या सहकार विभागाच्या नियामक मंडळावर निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ना. मकरंद पाटील बोलत होते. यावेळी खा. नितीन पाटील, हरिष पाटणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, माजी जि.प अध्यक्ष उदय कबुले, ज्येष्ठ नेते प्रतापराव पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, मिलींददादा पाटील, सा. मा. साळुंखे, चंद्रकांत ढमाळ, मनोज पवार, राजेंद्र राजपुरे, अॅड. शामराव गाढवे, प्रमोद शिंदे, प्रा. एस. वाय. पवार, सुनिल शेळके, शिवाजी शेळके, दिलीप पिसाळ, बाळासाहेब साळुंखे, संभाजी साळुंखे, अजय भोसले, गजेंद्र मुसळे, रामदास गाढवे, रविराज दुधगावकर, गणीभाई कच्छी, आशुतोष भरगुडे-पाटील, महेश राऊत, दिलीप आवाडे, अभिजीत चव्हाण, विजय ढमाळ, सचिन ढमाळ, पूजा संकपाळ, राजेंद्र ढमाळ, निवास शिंदे यासह तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. मकरंद पाटील म्हणाले, पहिल्या पराभवापासून आजपर्यंत न थकता मी लोकांमध्ये आहे. लोकांनी कायम मला चढत्या मताधिक्याने विजयी केले आहे. वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघात केलेल्या विकासकामांची ही पोहोच पावती आहे. कामे अजूनही खूप करायची आहेत. खंडाळा तालुका पूर्वी दुष्काळी होता. अथक मेहनतीने या तालुक्याचा दुष्काळ हटवला आहे. उर्वरित उपसा सिंचन योजनेची टेंडर्स या महिन्यात निघतील. खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागातील 14 गावे पाण्यापासून वंचित आहेत. हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. गेले काही दिवस या विषयावर मी काम करत आहे. आपल्याकडे आपल्या हक्काचे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या 14 गावांचा समावेश निरा - देवघरमध्ये करुन या वंचित 14 गावांना पाणी देणारच हा या मकरंद पाटलाचा शब्द आहे. येत्या काही वर्षात ही 14 गावेही ओलिताखाली आलेली दिसतील, असेही ना. मकरंद पाटील म्हणाले.
हरीष पाटणे म्हणाले, स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या समृद्ध विचारांचा वारसा ना. मकरंद पाटील व खा. नितीनकाका पाटील जपत आहेत. खंडाळा तालुक्याने या कुटुंबावर प्रेम केले आहे. त्यामुळेच त्या अधिकारातूनच तालुक्यातील जनतेचा मकरंदआबांकडे आग्रह राहतो. तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून शेतीच्या पाण्यापासून वंचित असलेल्या पश्चिम भागातील 14 गावांना पाणी उपलब्ध करुन द्यावे, हा आपला आग्रह आहे. याबाबत ना. मकरंदआबा निश्चितपणे निर्णय घेतील याचीही आपणाला खात्री आहे. असवली हे आमच्या पंचक्रोशीतील सर्वांत मोठे गाव. या गावाने केलेला माझा नागरी सत्कार मला घरचा सत्कार वाटतो, असेही पाटणे म्हणाले.
बाळासाहेब सोळस्कर म्हणाले, मकरंदआबा व नितीनकाका भान हरपून काम करत आहेत. स्व. लक्ष्मणराव पाटील यांचा वारसा जपत आहेत. दत्तानाना ढमाळ यांनी त्यांच्या सत्काराचा त्याचबरोबर या तालुक्यातील सुपुत्रांचा केलेला सन्मान सोहळा कौतुकास्पद आहे.
प्रास्तविक करताना दत्तानाना ढमाळ म्हणाले, स्व.लक्ष्मणराव पाटील यांच्या कार्याचा वसा ना. मकरंद पाटील व खा. नितिन पाटील जपत आहेत. त्यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधीलकीतुनच अवसायनात आलेले किसनवीर व खंडाळा हे दोन्ही साखर कारखाने पुन्हा एकदा कात टाकत आहेत. सगळी कामे झाली आहेत. आबांनी आता पश्चिम भागातील 14 गावांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करावेत. ही गावे आबांना कधीही विसरणार नाहीत.
यावेळी जिजाबा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सचिन ढमाळ यांनी केले तर आभार चंद्रकांत ढमाळ व दिलीप आवाडे यांनी मानले.
असवलीने माझा, खा. नितीनकाकांचा, हरीष पाटणे व जिजाबा पवार यांचा केलेला नागरी सत्कार आम्हा सर्वांची ऊर्जा वाढवणारा आहे, असेही ना. मकरंद पाटील म्हणाले. किसनवीर व खंडाळा साखर कारखानाच्या सभासदांच्या उसाचे थकित बील येत्या काही दिवसांतच सभासदांच्या खात्यावर जमा होईल, असे ना. मकरंद पाटील म्हणाले.