

सातारा : राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचे साताऱ्यात सूत जुळत नसल्याचे चित्र आहे. विधानसभेतील सत्तेच्या समीकरणाचा जुमला जुळवण्यात वरिष्ठ नेतेमंडळींना यश आले असले, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधीलच नेतेमंडळींमध्ये सुंदोपसुंदी कायम आहे. यातून आगामी निवडणुकांत आपापल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये ज्याने-त्याने स्वतंत्र निर्णय घ्यावा, असे ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमधील घटक पक्षांच्या समन्वय समितीची बैठक नुकतीच साताऱ्यातील विश्रामगृहावर पार पडली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला खा. उदयनराजे भोसले, खा. नितीनकाका पाटील, आ. अतुल भोसले यांची उपस्थिती होती.
नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनीच एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. आधीच महायुतीमध्ये असूनही नेत्यांचे एकमेकांशी सूत जुळत नाही, असे चित्र आहे. राज्यातील नेत्यांनी महायुतीचे आदेश दिले तरी युतीला पोषक अशी स्थिती सातारा जिल्ह्यात कुठेही नाही. जिल्हा परिषदेच्या 65 गटांपैकी 2 ते 3 गट सोडले तरी उरलेल्या सर्वच गटांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्येच ‘टफ फाईट’ होणार असल्याचे चित्र समोर आले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन समन्वय समितीचे महायुतीच्या ज्या-त्या आमदारांनी तसेच तेथील स्थानिक नेत्यांनी युतीबाबतचा निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरले आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांचे पायात-पाय अडकले आहेत. वाईमध्ये ना. मकरंद पाटील आणि माजी आमदार व भाजप नेते मदन भोसले यांच्या कार्यकर्त्यांतच राजकीय फाईट होणार आहे. त्यातच राष्ट्रवादी अंतर्गत दोन गट झाले असल्याने समन्वय साधण्याची मोठी कसरत ना. पाटील यांना करावी लागणार आहे. सातारा मतदारसंघातील गट, गणांसोबत दोन्ही राजेंना मानणारे कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. या ठिकाणी भाजपमध्येच इच्छुकांची मोठी संख्या असून सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडीमधील कट्टर कार्यकर्ते अजूनही गळ्यात गळे घालताना दिसत नाहीत. नेते एकत्र आहेत, म्हणून मजबुरीपोटी कार्यकर्ते कार्यक्रमांमध्ये एकत्र येत आहेत. मात्र, ऐन निवडणुकीत मोठा ‘ढवाणा’ होणार आहे.
पाटणमध्ये दस्तुरखुद्द पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आणि त्यांचे तेथील पारंपरिक विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. हे दोन्ही नेते महायुतीचे घटक असले तरी ते एकीऐवजी बेकीचीच भाषा बोलत असल्याचे चित्र आहे. कराड उत्तरमध्ये विद्यमान आ. मनोजदादा घोरपडे यांच्याविरोधात धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनी सह्याद्री कारखाना निवडणुकीत दंड थोपटले होते. आता हे नेते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दबाव वाढवण्याची शक्यता आहे. कराड दक्षिण मतदारसंघामध्ये डॉ. अतुल भोसले यांचे प्राबल्य वाढू लागले असले तरी शिवसेना एकनाथ शिंदे गटाने देखील या ठिकाणी शिरकाव करुन आपली ताकद वाढवायला सुरुवात केलीय. याचा परिणाम कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून येणार आहे.
महायुतीमधील घटक पक्षांचे सूत फलटण, माण या मतदारसंघांमध्ये जुळू शकते. मात्र, ना. मकरंद पाटील आणि ना. जयकुमार गोरे यांच्यातील मागील काही कालावधीमधील राजकीय खेळ्या लक्षात घेता, आगामी काळात महायुतीला सुरुंग लागण्याचीच शक्यता जास्त आहे.