Fort Conservation : प्रतापगडसह ११ ऐतिहासिक गडकिल्ले महामार्गांशी जोडणार

‘फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर’ला गती : पर्यटकांसाठी रस्त्यांसह मूलभूत सुविधांचा विकास
Fort Conservation
प्रतापगडसह ११ ऐतिहासिक गडकिल्ले महामार्गांशी जोडणार
Published on: 
Updated on: 

विशाल गुजर

सातारा : राज्यातील गडकिल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महत्त्वाकांक्षी ‘फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर’ हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांना मुख्य महामार्गांशी जोडण्यासाठी दर्जेदार रस्त्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात राज्यातील ११ किल्ल्यांचा समावेश करण्यात आला असून सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा त्यापैकी प्रमुख किल्ला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या प्रकल्पावर काम सुरू असून सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) मान्यता मिळाली आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत डीपीआरचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुणे प्रादेशिक विभागातील पाच किल्ल्यांचाही या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

महामार्गापासून थेट किल्ल्यापर्यंत रस्ता...

राज्यातील अनेक गडकिल्ल्यांच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या अरुंद, खराब किंवा अपुऱ्या दर्जाचे रस्ते आहेत. त्यामुळे पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी ‘फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर’ची संकल्पना राबवण्यात येत आहे. महामार्गापासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत नवीन व दर्जेदार रस्ते विकसित केले जाणार आहेत.

किल्ल्यांवर पर्यटकांसाठी सुविधा...

या प्रकल्पात केवळ रस्ते बांधण्यावर भर न देता पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांचाही विकास केला जाणार आहे. यामध्ये स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, सुरक्षित वाहनतळ आणि किल्ल्याची ऐतिहासिक माहिती देणारे माहिती फलक यांचा समावेश असेल. या सुविधा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

‘फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर’ किल्ले

पुणे : लोहगड,

राजगड, शिवनेरी

कोल्हापूर : पन्हाळा

सातारा : प्रतापगड

रत्नागिरी : सुवर्णदुर्ग

नाशिक : साल्हेर

सिंधुदुर्ग : विजयदुर्ग, सिंधुदुर्ग (मालवण)

रायगड : रायगड, खांदेरी

किल्ल्यांपर्यंत पोहोचणे सुलभ करणे म्हणजे केवळ रस्ते बांधणे नव्हे, तर महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाला आणि पर्यटनाला नवी दिशा देणे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणारे प्रतापगड, राजगड, रायगड, शिवनेरी, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, तसेच समुद्रकिनाऱ्यावरील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी यांसारखे किल्ले देश-विदेशातील पर्यटकांसाठी अधिक सुलभ होणार आहेत. या ऐतिहासिक स्थळांना महामार्गांच्या माध्यमातून जोडताना केवळ वाहतूक सुविधा नव्हे, तर किल्ल्यांचे संवर्धन, पर्यावरणाचे रक्षण आणि स्थानिकांच्या हिताचा समतोल साधला जाईल.
- शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news