

प्रेषित गांधी
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सोमवारी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये भिलार गट हा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने दिग्गज गोत्यात आले. त्यामुळे दुसर्या गटात घुसखोरी करण्याची वेळ आली आहे. तळदेव गट खुला झाला आहे. त्यामुळे या गटातून संजूबाबा गायकवाड यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. कुंभरोशी व तळदेव गण खुला झाल्याने सर्वपक्षीय इच्छुकांच्या उड्या पडणार आहेत. भिलार गटासह दोन गण राखीव झाल्याने काहींचा पत्ता कट झाला तर काहींना नशीब आजमवण्याची संधी मिळाली आहे.
भिलार गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने जिल्हा परिषदेत जाण्याचे स्वप्न पाहणार्या राजेंद्र राजपुरे, नितीन भिलारे, तेजस्विनी भिलारे, प्रविण भिलारे यांच्यासह दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे. यामुळे सर्वच पक्षांना उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद असून स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या नावाचा करिश्मा या गटात चालतो. त्यामुळे राष्ट्रवादी जो उमेदवार उभा करेल तो विजयी होईल, अशी अटकळ आतापासूनच बांधली जात आहे.
तळदेव गट सर्वसाधारणसाठी खुला झाल्याने जिल्हा परिषदेत प्रवेशासाठी उत्सुत्क असलेले माजी सभापती संजूबाबा गायकवाड यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. संजूबाबांनी गेली कित्येक वर्षे स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली या गटात काम पाहिल्याने संजूबाबांना जिल्हा परिषदेत आणण्याचे भिलारेदादांचे स्वप्न मकरंदआबा या खेपेला पूर्ण करतील, असे तूर्तास तरी वाटते. संजूबाबांच्या वाटचालीत कुणी गेमा केल्या नाहीत तर त्यांचा मार्ग निर्धोक असेल.
या गटातून बाळासाहेब भिलारे यांचे चिरंजीव नितीनदादा यांचेही नाव जाणीवपूर्वक चर्चेत आणले जात आहे. मात्र, नितीनदादा भिलार गणात आपल्या घरातला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असेच दिसते. शिवसेना शिंदे गटाचीही या गटात ताकद असल्याने सेनेकडून संजय मोरे, अजित संकपाळ, बजरंग संकपाळ यांच्यासह आणखी काही नावे समोर येवू शकतात. त्यामुळे या गटात राष्ट्रवादी विरूध्द शिवसेना असा थेट सामना होणार आहे. तर शरद पवार गट व ठाकरे गट कुणाला मैदानात उतरवणार याकडेही लक्ष असेल.
भिलार गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने येथे नेत्यांना सौभाग्यवतींना मैदानात उतरवावे लागणार आहे. स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या सूनबाई डॉ. तेजस्विनी जतीन भिलारे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या पत्नी माजी सभापती रुपाली राजपुरे, प्रवीण भिलारे यांच्या पत्नी वंदना भिलारे या राष्ट्रवादीतून तर शिवसेनेकडून वैशाली भिलारे व कौशल्या भिलारे यांची नावे चर्चेत आहेत. भिलार गट - गणावर बाळासाहेब भिलारे यांच्या कुटुंबाचा प्रभाव असल्याने त्यांच्या घरातील व्यक्तीला या गणातून उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे. जर नितीन भिलारे यांना तळदेव गटातून उमेदवारी दिली तर राजपुरे व प्रविण भिलारे यांच्या कुटुंबात उमेदवारी जावू शकते. बाळासाहेब भिलारे यांचे आपण वैचारिक वारसदार असल्याचा दावा प्रविण भिलारे हे करत असल्याने मकरंद आबा त्यांनाही संधी देवू शकतात.
मेटगुताड गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाल्याने आधीपासूनच आम्ही नाहीतर आमच्या पत्नी तरी या आशेवर असलेल्या इच्छुकांचा आरक्षणाने भ्रमनिरास झाला आहे. आरक्षण जाहीर होताच अनेकांनी काढता पाय घेतला. राष्ट्रवादीसह शिवसेना, भाजप, पक्षास या गणामधून एखादा नवीन चेहरा द्यावा लागणार आहे. सध्या क्षेत्र महाबळेश्वरच्या माजी सरपंच सारिका पुजारी, शरद पवार गटाकडून गीतांजली संकपाळ, मुन्नावर वारुणकर यांच्या पत्नी अफशा वारुणकर, प्रियांका ढेबे यांच्या नावांची चर्चा आहे.
तळदेव गण खुला झाल्याने रंगत येणार आहे. शिवसेनेकडून गणेश उतेकर, ठाकरे गटाकडून संतोष जाधव, शरद पवार गटाकून सुभाष कारंडे तर राष्ट्रवादीकडून संजय शेलार, अजित सकपाळ, सागर कदम, भाऊसाहेब मोरे, संजय उतेकर हे इच्छुक असून चुरशीची लढत होणार आहे. कुंभरोशी गणही खुला झाल्याने सर्वच पक्षांच्या या गणावर नजरा आहे. राष्ट्रवादीकडून सचिन उतेकर, सुभाषअण्णा सोंडकर, सुरेश सावंत, शिवसेना शिंदे गटाकडून संजय मोरे, समीर चव्हाण, धोंडीबा धनावडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुभाष कारंडे, तर भाजपकडून बबन उतेकर, सनी मोरे यांची नावे चर्चेत आहेत.
महाबळेश्वर तालुक्यातील राजकारण हे राष्ट्रवादी एके राष्ट्रवादी असेच राहिले होते. मात्र, आता शिवसेनेने प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान निर्मण केले आहे. राज्यातील राजकारणात घडलेल्या प्रचंड उलथापालथी, राजकीय घडामोडींचा तालुक्याच्या राजकारणावरही परिणाम झाला आहे. दोन्ही पक्ष महायुतीत असले तरी स्थानिक पातळीवर स्वबळाचा नारा दिला जाणार असल्याने येथील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.