

प्रेषित गांधी
महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेचे नगराध्यक्ष व प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर थंड महाबळेश्वरात राजकीय गरमागरमी वाढली आहे. नगराध्यक्षपद खुले झाल्याने निवडणूक अटी-तटीची होणार आहे. यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थकारण होण्याची अटकळ बांधली जात आहे. या निवडणुकीत कोण- कधी -कसा कुणासोबत एकत्र येईल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र किंवा ‘मित्राचा शत्रू हा आपला शत्रू किंवा शत्रूचा मित्र हा आपला मित्रच अशी समीकरणे महाबळेश्वरमध्ये सुरू झाली आहेत. या समीकरणांच्या जोरावर शहराच्या राजकारणाचा चेहरा-मोहराच बदलून टाकला आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक जुने, नवीन व ज्येष्ठ बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत. विविध क्लृप्त्या लढवत जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे. हौशे-नौश्यांनी सोशल मीडियावर उमेदवारी जाहीर करत प्रचाराला सुरूवात केली आहे. शहरात आजी-माजी नगरसेवकांनी आपणच विकासाचा ठेका घेतल्याचा आभारस निर्माण करून भेटींवर भर दिला आहे. नगराध्यक्षपद खुले झाल्याने रोज नवीन नावांची भर पडली आहे. शहरातील पूर्वीच्या विकासाच्या राजकारणाने आर्थिक विकास साधण्यावर गेली आहे. त्यामुळे कोट्यवधींची उड्डाणे घेणारे उमेदवार निर्माण झाले आहेत.
अनेकांनी शहराचा नव्हे तर स्व विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवला आहे. यामुळेच आता मतदारही स्वत:चा फायदा पाहून मतदान करत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. आठ वर्षानंतर होवू घातलेल्या निवडणुकीआधीच आपल्या प्रभागातील इच्छुक उमेदवारांकडून स्वतः चा ‘फायदा’ साधत आपली ‘दिवाळी’ची भरभराट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
आज शहरातील तरुणांना एका छताखाली सर्व सोई सुविधा देऊन राजकीय मंडळी आपली पुंगी वाजवण्यात यशस्वी झाले आहेत. आर्थिक ताळमेळ व निवडणुकीतील साठेबाजार पाहता ही निवडणूक सर्वसामान्य उमेदवारांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी कोटींची उड्डाणे होणार आहे. निवडणुका टप्प्यात आल्याने विविध पक्ष आघाड्यांचे नेते व संभाव्य उमेदवारांनी आपला जनसंपर्क वाढवण्यासाठीची वाटचाल आतापासूनच सुरु केली आहे. नगरसेवक होण्याची मोहीम फत्ते करण्याची तयारी त्यावर होणारी आर्थिक तरतूद याची गोळाबेरीज करण्यात व्यस्त आहेत.
महाबळेश्वरच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला असून त्यातून दर्जेदार रस्ते, मुनावळे, तापोळा परिसराचा विकासात्मक बदल होत आहे. त्याा पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाचीही दिशा बदलणे गरजेचे आहे. महाबळेश्वरची थंड हवा हीच एकमेव जमेची बाजू आहे. शासनाकडून कोट्यवधींचा निधी येतो परंतु त्याचा सदुपयोग करून घेणाऱ्या कणखर व सच्चा नेतृत्वाची शहराला खरी गरज आहे. विकासापासून कोसो दूर असलेल्या दिशाहीन शहराला एका मार्गदर्शकाची व खंबीरपणे पुढे घेऊन जाणाऱ्या नगराध्यक्षाची गरज आहे. तसेच विकासाचा ध्यास घेतलेल्या नगरसेवकांचीही त्याला जोड असणे आवश्यक आहे. अन्यथा महाबळेश्वरची केवळ थंड हा हीच एकमेव ओळख राहील.