

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती पूर्ण ताकतीने उतरणार आहे. आमच्या सरकारचे काम चांगले असून विकासाचे लोकाभिमुख काम सर्वसामान्यांसाठी केलेले आहे. विरोधक म्हणजे महाविकास आघाडी नसून ती महा कन्फ्यूज आघाडी असल्याचा टोला उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी लगावला. दरम्यान, शिंदे यांनी दोन्ही ठाकरे बंधूंचाही यावेळी समाचार घेतला.
ना.एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ना. शिंदे म्हणाले, विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. महायुतीच जिंकणार अशी त्यांची खात्री झाली आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले आहे. लाडक्या बहिणींनी, भावांनी, शेतकऱ्यांनी विरोधकांना विरोधी पक्षनेता बनण्याइतकही संख्याबळ मिळू दिले नाही. यामुळे अजूनही निवडणुकांना सामोर जाण्याची हिम्मत विरोधकांमध्ये राहिलेली नाही.
महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये महायुती पेक्षा जास्त जागा मिळाल्या तेव्हा निवडणूक आयोग चांगला होता. आणि आता हरल्यानंतर निवडणूक आयोगाला दोष देण्याचे काम ते करत आहेत. सन्नाटा आमच्याकडे आहे की त्यांच्याकडे आहे. हे सगळे लोक कन्फ्युज झालेले आहेत. हे लोक सगळे एकत्र येतात तेव्हा जिंकण्याची खात्री पटली पाहिजे. मात्र ते निवडणूक पुढे ढकला म्हणतात म्हणजे त्यांना जिंकण्याची खात्री नाहीये, असे म्हणत राज ठाकरे यांच्या विधानावर त्यांनी टोला लगावला. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हा त्यांची हुकमशाही पाहिली आहे.