Cyber Crime: केवायसीची लिंक करतेय लाखाचे बारा हजार

क्लिक करताच बँक डिटेल्सची चोरी : खात्यातून पैसे गायब
Cyber Crime: केवायसीची लिंक करतेय लाखाचे बारा हजार
Published on
Updated on

विठ्ठल हेंद्रे

सातारा : सायबर क्राईम हा मोबाईल ऑनलाईनमुळेच होत असून, दिवसेंदिवस फसवणूक करण्याच्या पद्धतीमध्ये वाढ होत आहे. केवायसीच्या नावाखाली गंडा घातला जात आहे. केवायसी करायची असल्याची बतावणी करून एसएमएसमध्ये लिंक दिली जात आहे. त्यावर क्लिक होताच बँक डिटेल्सची माहिती चोरट्यांना मिळत आहे. त्यातूनच लाखाचे बारा हजार होत असल्याचे अनेक किस्से सातारा जिल्ह्यात समोर येऊ लागले आहेत.

सद्यस्थितीच्या काळात चोरटे स्मार्ट झाले आहेत. सायबर चोरटे मोबाईल टेक्नोसॅव्ही बनले असून अगदी घरबसल्या सहज दुसऱ्यांच्या बँक खात्यावर दरोडा टाकत आहेत. सायबर फ्रॉड ही आपोआप होणारी प्रक्रिया नाही. त्यासाठी सायबर चोरट्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संवाद साधावाच लागतो. सायबर चोरटे यासाठी फोन करणे, मेसेज किंवा लिंक पाठवतात. आपणच आपले फोटो, माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याने ज्यांना फसवायचे आहे त्यांची वैयक्तिक, सामाजिक माहिती देखील सायबर चोरट्यांना असते. केवळ मोहजाळात, माहितीच्या आधारे व आमिष दाखवून सायबर चोरटे त्यांची मोहीम फत्ते करत आहेत.

केवायसी हा सध्या परवलीचा विषय. याप्रकारात एसएमएसमध्ये लिंक येते. बँकेचे केवायसी अपडेट करायचे आहे, असे सांगितले जाते. लिंकवर क्लिक केल्यावर डुप्लिकेट वेबसाईट उघडली जाऊन तुमचे सर्व बँक डिटेल्स घेतले जातात. यानंतर तुमच्या खात्यातून पैसे गायब होतात. कास्टींग फ्रॉड फसवणुकीमध्ये मोठ-मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसच्या नावाने, ‌‘तुमच्या मुलीला, मुलाला पिक्चर मध्ये काम देतो‌’ असे दाखवून करारही केले जातात. त्यानंतर फोटोशूट, ड्रेसेस खर्चाच्या नावाखाली लाखोंची रक्कम उकळली जाते. या सर्व बाबी ऑनलाईन होतात आणि आरोपी कधीही तुमच्या समोर येत नाही.

सायबर क्राईममधील गुन्ह्यांचा तपास लावणे हे अतिशय जिकिरीचे आणि चिकाटीचे काम असते. सायबर पोलिसांचा विभाग कौशल्याने तांत्रिक बाबींवर तपास करत असतो. पण ‌‘माणूस आयुष्यातून उठू शकतो‌’ इतकं गंभीर स्वरूप या साबयर गुन्ह्यांच आहे. यामुळे फसवणूक होणाऱ्यांनी तत्काळ सायबर टोल फ्री 1930 किंवा 1945 यावर संपर्क करावा. तसेच स्थानिक पोलिस स्टेशनशी किंवा सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

लोन, फेक फेसबुक प्रोफाईल फ्रॉड...

कर्ज (लोन) हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. यात मोठ-मोठ्या फायनान्स कंपन्यांच्या नावांचा वापर केला जातो. अगदी पंतप्रधानांचा फोटो वापरून वेबसाईट तयार करून ‌‘पंतप्रधान कर्ज निधी‌’ मधून कर्ज देण्याच्या जाहिरातीसुद्धा केल्या जातात. कर्जाच्या रकमेच्या काही टक्के रक्कम तुमच्याकडून आधीच घेतली जाते आणि सायबर चोरटे गायब होतात. सोशल मीडियावरील फेसबुक प्रसिध्द आहे. यामध्ये तुमच्याच फेसबुक प्रोफाईलवरील माहिती घेऊन दुसरे प्रोफाईल तयार केले जाते आणि त्यावरून तुमच्या मित्र मंडळींना पैशाची मागणी केली जाते.

जीवावर उठणारा मायनर गर्ल्स फ्रॉड...

मायनर गर्ल्स फ्रॉड हा एक भयंकर प्रकार आहे. पालकांच्या नकळत कधीकधी अल्पवयीन मुली इन्स्टाग्रामवर आपण 18 वर्षावरील असल्याचे दाखवून अकाऊंट उघडतात. या मुलींना हेरून एखाद्या मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मैत्री झाल्यावर ‌‘माझ्याकडे स्तनांचा आकार वाढवायचे औषध आहे. पण त्यासाठी आधी तुझी साईज बघावी लागेल‌’ असे सांगून तिच्या कडून नग्न व्हिडीओची मागणी केली जाते. तो दिला की मग ब्लॅकमेलिंग सुरू होतं.

कस्टम गिफ्ट, इन्शुरन्स फ्रॉड...

कस्टम गिफ्ट फ्रॉड प्रकारात प्रामुख्याने स्त्रियाच जास्त फसल्या गेल्या आहेत. यामध्ये विशेष करून अविवाहित, एकल महिलांचा समावेश आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन त्या एकाकी आहेत. याचा अंदाज घेतला जातो व ऑनलाईन मैत्रीचे जाळे फेकले जाते. थोडी मैत्री झाल्यावर ‌‘मी तुला एक गिफ्ट परदेशातून पाठवतोय‌’ म्हणून सांगितले जाते. मग तिला ‌‘कस्टम डिपार्टमेंट‌’च्या नावावर कॉल येतो आणि लाखो रुपये भरायला सांगून फसवणूक केली जाते. इन्शुरन्स फ्रॉडची कोरोनापासून जोरात चलती सुरु आहे. आरोग्य, इन्शुरन्स क्लोजरच्या नावाखाली फसवले जात आहे.

डिजिटल अरेस्ट आणि आर्थिक फसवणूक ही आज गंभीर समस्या बनली आहे. डिजिटल अरेस्ट अशी कोणतीच कारवाई कायद्यामध्ये नाही. आणखी एक आर्थिक फ्रॉड म्हणजे म्युच्युअल फंड, गुंतवणूक योजनांमध्ये जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले जाते. अनोळखी कंपनीमध्ये अथवा ॲपद्वारे आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्या.
- वैशाली मंडपे, सातारा सायबर प्रशिक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news