

कराड : 25 वर्षापासून प्र्रतिक्षेत असणार्या कराडला नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुला प्रवर्ग पुरूष आरक्षण पडल्यामुळे इच्छूकांची मंदियाळी वाढणार आहे. आतापर्यंत एक साथ, मिलजुलके काम करणारे इच्छूक आता स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आतापर्यंतची राजकीय समीकरणे बदल्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगराध्यक्षपद खुल्या वर्गासाठी आरक्षित होण्यासाठी अनेकजणांनी देव पाण्यात घातले होते. त्यामुळे प्रतिक्षेत असणारे इच्छूक आपली तलवार काढणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या चार वर्षापासून कराडवर प्रशासन राज असले तरी पालिकेचे घोडामैदान जसजसे जवळ येईल तसे अनेक माजी नगरसेवक, इच्छूकांनी मैदानात उतरल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत होते. वर्षभरात प्रत्येक कार्यक्रमात मतदारांना जवळ करताना अनेक दिग्गज एकमेकांच्या जवळ येत असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. अनेकांचे जाहीर प्रवेश झाले. मात्र असे असले तरी नगराध्यक्षपदाचे पडलेल्या आरक्षणामुळे राजकीय परिस्थिती बदलण्याची चर्चा आहे. कोणकोणासोबत असणार? की स्वतंत्र आघाड्या निर्माण होणार याबाबत राजकीय गोटात खलबते सुरू झाली आहेत. अनेकांची आ. अतुलबाबा भोसले यांची जवळीकता वाढली आहे. मात्र यापैकी कोणाला आ.डॉ. अतुलबाबा पुढे करणार याबाबतही उत्सुकता राहणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी आपली भूमिका आतापर्यंत स्पष्ट केली नव्हती मात्र लवकरच त्यांचीही भूमिका स्पष्ट होईल. तर शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव एकटे लढणार की महायुतीसोबत लढणार हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.
डॉ. अतुलबाबा कोणाला संधी देणार?
मध्यंतरी अनेकजणांनी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याशी जवळीक साधत जाहीर प्रवेश केला. नगरपालिका निवडणूकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले. मात्र आता आ. अतुलबाबा भोसले कोरी पाटी असणार्या उमेदवाराला तिकिट देतील अशी चर्चा असतानाच दुसरीकडे शहरातील काही दिग्गजांची नावेही पुढे येत आहेत. तसेच उमेदवार मूळ भाजपचा असेल की भाजपला मदत करणार्यांपैकी असेल? त्यामुळे कोणाला संधी दिली जाईल याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.