

कराड : दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश असणार्या कराड तालुका पंचायत समितीच्या सभापती पदासाठी बुधवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. यामध्ये सभापतीपद अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा हिरमूड झाला असला तरी आपल्याला नाही किमान आपल्याच घरात सभापती पद कसे मिळेल यासाठी ते प्रयत्नशील राहतील यात शंका नाही. यात नेत्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे.
कराड दक्षिण व उत्तर अशा दोन विधानसभा मतदार सघांत विभागालेल्या कराड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे राजकारण नेत्यांभोवती फिरते. माजी मुख्यमंत्री, माजी सहकार मंत्री, भाजपचे दोन विद्यमान आमदार अशा तगड्या नेत्यांच्या गटांत होणारी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे राजकारण मोठ्या चुरशीचे होण्याचे संकेत आहेत. दोन्ही विधानसभा मतदार संघात सध्या भाजपचे आमदार असल्याने त्यांची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे कराड दक्षिणेत भाजप विरूध्द काँग्रेस व राष्ट्रावादी काँग्रेस (शरद पवार गट) तर कराड उत्तरेत भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अशी थेट लढत शक्य आहे.
2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कराड तालुक्यात 12 गट व 21 गण होते. नवीन चार गण व दोन गट वाढले होते पण ते अंतिम न झाल्याने जुन्याच रचनेनुसार निवडणुका होणार आहेत. 2017 च्या रचनेनुसार पंचायत समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्यात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाने सभापतीपद आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले होते. त्यावेळी उंडाळकर गटाचा (काँग्रेसतंर्गत) उपसभापती झाला होता. येणार्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकीय उलथापालथ होणार आहे.
आ.डॉ.अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिणेत आपले संघटन वाढविले आहे. त्यामुळे भाजप व महायुतीतील घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अॅड. उदयसिंह पाटील एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार की पक्षाच्या चिन्हावर लढणार याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल.सध्या तरी स्थानिक पातळीवर या नेत्यांचे मनोमिलन झालेले दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे हे तिन्ही पक्ष आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जातील असे सध्या तरी दिसते. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी तसे बोलनही दाखविले आहे.
आघाडी, पक्ष पातळीवर काही निर्णय झाले तरी कराड उत्तरेतील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजपा यांच्यात दुरंगी सामना पहायला मिळेल. सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने 24 सदस्य संख्या असणार्या पंचायत समितीची सत्ता राखण्यासाठी मोठी रस्सीखेच होईल. सदस्यांचे गणनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर हालचाली अधिक गतीमान होतील.
मार्च 2022 पासून सत्ता प्रशासकाकडे ..
कराड तालुक्यात 2017 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस,भाजप यांच्यात लढत होती. त्यावेळी कराड दक्षिणेत काँग्रेस तर उत्तरेत राष्ट्रवादीचे प्राबल्य होते. त्यात राष्ट्रवादीने बाजी मारत पंचायत समितीत सभापतीपद मिळवले होते. बाळासाहेब पाटील गटाच्या शालन माळी सभापती झाल्या तर उंडाळकर गटाचे रमेश देशमुख उपसभापती झाले. सव्वा वर्षानंतर सभपतीपद उंडाळकर गटाला देण्यात आले होते. सौ.फरिदा इनामदार सभापती झाल्या तर बाळासाहेब पाटील गटाचे सुहास बोराटे उपसभापती झाले होते. पुढील अडीच वर्षांसाठी सभापतीपद अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले. बाळासाहेब पाटील गटाचे प्रणव ताटे सभापती झाले. उंडाळकर गटाचे रमेश देशमुख उपसभापती झाले. त्यांना पूर्ण अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. 13 मार्च 2022 मध्ये त्यांचा कार्यकाल संपला. तेंव्हापासून पंचायत समितीवर प्रशासक आहे.