

प्रतिभा राजे
कराड : कराड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, मतदारांपासून ते पक्षांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक नवीन चेहरे राजकारणात पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची हालचाल वाढली असून, प्रचाराची प्राथमिक तयारीही सुरू झाली आहे. काही ठिकाणी बैठका, तर काही ठिकाणी जनसंपर्क मोहिमा गती घेत आहेत. अनेक नवीन इच्छूक तिकिटासाठी वाट पाहात आहेत. तिकिट नाही मिळाले तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
कराड नगरपालिकेची निवडणूक दुरंगी, तिरंगी की चौरंगी होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दररोज संदर्भ बदलत आहेत. मात्र, प्रत्येक पक्षातून इच्छुकांची गर्दी पाहता या वेळी चुरस अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे जशास तशी टक्कर देण्यासाठी राजकीय पक्षांनी तोलामोलाचे उमेदवार रिंगणात उतरविण्याची रणणिती आखली आहे. उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धावाधाव सुरू झाली असून अघोषित प्रचाराने निवडणुकीचा रंग चढत चाललेला आहे. 2016 च्या पालिका निवडणुकीवेळी जे इच्छूक रिंगणात उतरले होते त्यातील अपयशी उमेदवार यंदा पुन्हा मैदानात उतरण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. तसेच याचबरोबर यावेळी नवीन चेहरेही जास्तीतजास्त रिंगणात दिसणार आहेत. या इच्छूकांना थांबवणे ही त्या त्या पक्षाची, आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. मात्र तिकिट मिळाले नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत अनेक इच्छूक आहेत.
कराड शहरात अनेक सामाजिक कार्यकर्ते समाजातील विविध घटकांसाठी, विविध प्रसंगी नागरिकांच्या मदतीस धावून जातात. या सामाजिक कार्यकर्त्यांचाही शहरात नागरिकांचे विशेष गट आहेत. त्यामुळे नागरिकांचा कल सामाजिक कार्यकर्त्यांकडे आहे.
गेल्या टर्ममध्ये नगरसेवकांच्या कामकाजाबाबतची नाराजी, शहरातील विकासकामांचा झालेला बट्याबोळ यामुळे शहराच्या विकासासाठी झटणारा नगरसेवक असावा, अशी अपेक्षा नागरिकांची असल्याने या सामाजिक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढावी अशी अपेक्षा आणि मागणी नागरिकांकडून जोर धरत असल्याने या सामाजिक कार्यकर्ते मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची संख्या वाढणार आहे. राजकीय समीकरणे आणि स्थानिक विकासाच्या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अधिक रोचक होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
प्रभागांमध्ये पडलेल्या आरक्षणानुसार त्या त्या प्रभागातील इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. त्यामुळे पक्षाकडून तिकिट न मिळालेले इच्छुक बंडखोरी करण्याची शक्यता असल्याने बंडखोरांची संख्या वाढणार असून या बंडखोरांना रोखणे हे आव्हान ठरणार आहे.