सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहरासह जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून रविवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पश्चिम भागातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, हवामान विभागाने मध्यम ते जोरदार पाऊस व घाट क्षेत्रात रेड अलर्ट जारी केला आहे.
जिल्ह्यात रविवारी सातार्यासह वाई, जावली, महाबळेश्वर, कराड, पाटण, कोरेगाव तालुक्यांत ठिकठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. दिवसभर संततधारेचा अनुभव नागरिकांनी घेतला. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होते. हवेत गारठाही होता. दिवसभर पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्यांच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम होती. रविवारी पावसाळी पर्यटनासाठी पाचगणी, महाबळेश्वर, ठोसेघर, चाळकेवाडी, सज्जनगड, यवतेश्वर, कास, बामणोली, तापोळा यासह अन्य ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती. शहर व परिसरातील सखल भागात ठिकठिकाणी
पावसाचे पाणी साचले होते. तसेच रस्त्यावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहताना दिसत होते. शहर व परिसरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतूक संथ झाली होती. महामार्गावरही ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागले. रविवार बाजाराचा दिवस असल्याने सातारा शहर व परिसरातील भाजी मंडईत पावसामुळे राडारोडा निर्माण झाला होता. तसेच भाजी विक्रेत्यांसह अन्य विक्रेत्यांची अधूनमधून येत असलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. कोयना, कण्हेर, उरमोडी, धोम बलकवडी व धोम तसेच निरा धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वीर धरणातून निरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला.
रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 15.6 मि.मी., जावली 31.5 मि.मी., पाटण 34.3 मि.मी., कराड 26.7 मि.मी., कोरेगाव 7.7 मि.मी., खटाव 1.9 मि.मी., माण 1.4 मि.मी., फलटण 9.2 मि.मी., खंडाळा 32.8 मि.मी., वाई 23.6 मि.मी., महाबळेश्वर 50.2 मि.मी. पावसाची नोंद झाली.