पाटण : जून ते सप्टेंबर हा पावसाचा मुख्य हंगाम संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यातही पाऊस झाल्याने धरणात सध्या तब्बल 104.17 टीएमसी पाणीसाठा आहे. धरण अद्यापही जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत 29.09 वापर व 59.30 विनावापर अशा एकूण 88.30 टीएमसी पाण्यानंतरही हे धरण काटोकाठ भरलेले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आत्तापर्यंत तब्बल 70.56 टीएमसी जादा पाण्याची आवक झाली आहे. धरणांतर्गत विभागात सरासरी 1300 मि.मी. जादा पाऊस झाला आहे.
गतवर्षी धरणातून सिंचनासाठी तब्बल 38.14 टीएमसी पाणीवापर झाला होता, तर पश्चिम वीज निर्मितीसाठी आरक्षित 67.50 टीएमसी पाणीवापराला कात्री लागल्याने केवळ 57.22 टीएमसी पाण्यावरच पश्चिम वीजनिर्मिती झाली होती. यावर्षी धरणाची तांत्रिक स्थिती मजबूत आहे. एक जूनपासून सुरू झालेल्या नव्या तांत्रिक जलवर्षात 18 टीएमसी शिल्लक पाणीसाठ्यावर सुरुवात झाली. त्यामध्ये आत्तापर्यंत तब्बल 177.84 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
त्यापैकी आत्तापर्यंत पश्चिम वीजनिर्मितीसाठी 18.83 सिंचनासाठी 1.16, पूरकाळातील 9.10 व विनावापर सोडलेले 59.30 अशा एकूण 88.39 टीएमसी पाण्यानंतरही धरणात सध्या 104.17 टीएमसी पाणी शिल्लक आहे. पश्चिम वीजनिर्मिती व सिंचनाचा पाणीवापर लक्षात घेता आगामी काळात सिंचनासाठी सरासरी 34 तर पश्चिम निर्मितीसाठी 48 टीएमसी पाण्याची गरज आहे. मृतसाठा पाच अशा एकूण 87 टीएमसी पाण्याची भविष्यकाळात गरज आहे. धरणात सध्या तब्बल 104.17 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने कोयना धरणातील पाण्याची चिंता मिटली आहे.