

सातारा : महिलांबाबत घडणाऱ्या घटना लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मुख्यमंत्री कणखरपणे भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे. अशा घटनांमध्ये प्रशासनाचा हस्तक्षेप कारणीभूत आहे. फलटण येथील घटनेत डॉक्टर युवतीने होणाऱ्या त्रासाबाबत पोलिस उपअधीक्षकांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडली आहे. राजकीय दबावामुळेच तिने टोकाचे पाऊल उचलले आहे. डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
राष्ट्रवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत आ. शशिकांत शिंदे म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे संपली असून गृह खाते फेल गेले आहे. मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी आवरावे अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. आपल्या मागे कोणीतरी आहे अशी भावना पोलिसांमध्ये असल्याने सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात अवैध धंदे बोकाळले आहेत. हप्तेबाजी सुरू आहे, प्रचंड प्रमाणात क्राईम वाढले आहे. कोणाला भीती राहिलेली नाही. गुन्हेगार गुन्हा करुन जात आहे. क्रास कम्प्लेट केली जाते त्याला वाचवण्यात येते. 307 झाला असेल तर 324 केले जाते अशा प्रकारचा राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. राजकारणासाठी पोलिस बळाचा वापर केला जात आहे. गुन्हेगारांचे धाडस वाढल्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत.
सासपडेची घटना ताजी आहे. पहिल्या प्रथम गुन्हा झाल्यानंतर त्यावेळेला त्या आरोपीवर कारवाई झाली असती तर कदाचित ही 13 वर्षाची मुलगी वाचली असती. त्यानंतर फलटण येथील डॉक्टर युवतीने स्वत: पोलिस उपअधीक्षकांकडे व जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार दिली होती. या सर्व गोष्टींच्या पाठीमागे दुर्लक्ष केल्यामुळे गरीब घरातील तरुणीचा नाहक बळी गेला आहे. सातारचे पोलिस अधीक्षक नवीन असून त्यांनी एका दागिने चोराचा एन्काऊंटर केला आहे. पण जिल्ह्यातील पोलिसांबाबत प्रचंड असंतोष आहे. यामध्ये सुधारणा होत नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.
फलटण प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना आ. शिंदे म्हणाले, ज्यांच्याकडे सुरक्षा मागायची तेच या प्रकरणात गुंतलेले असतील तर न्याय कुणाकडे मागायचा. पीडितीने तक्रार दिल्यानंतर पोलिस उपअधीक्षकांनी यामध्ये लक्ष घातले असते तर संबंधितांची बदली झाली असती आणि हे प्रकरण घडले नसते. कोरेगाव तालुक्यातील मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष आहे. केसेस टाकायच्या पैसे काढायचे, दमबाजी करायची असे सर्व प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आता आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे आ. शिंदे म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रश्नावर बोलताना आ. शिंदे म्हणाले, सर्वजण पक्ष वाढवण्याचे काम करत आहेत. त्याप्रमाणे आमच्याही पक्षाचे काम सुरू आहे. आम्ही चांगल्या प्रकारे निवडणुकांना सामोरे जावू. त्यासाठीची तयारी सुरू आहे. मनसे शिवसेना एकत्र निवडणूक लढणार असे सांगितले जात असले तरी त्याबाबत आमच्याशी चर्चा झालेली नसून चर्चेनंतर निर्णय घेवू. नेते भाजपामध्ये जात आहेत आम्ही जनतेला घेवून निवडणूक लढणार आहोत. आम्हाला नेत्यांना घेवून निवडणूक करावयाची नाही. जनतेने त्यांच्या प्रश्नासाठी उठाव केला तर मग निवडणूक आमच्या बाजूने असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दिलीप बाबर, राजकुमार पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.