

सातारा : सायबर गुन्हेगारांविरोधात मंगळवारी सातारा व फलटण येथे दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. दोघांना सायबर भामट्यांंनी एकूण 9 लाखांचा गंडा घातला. पहिल्या घटनेत भामट्यांनी एका वृद्धाला डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून घरातून 15 दिवस बाहेर न पडण्याची तंबी देत त्याच्या खात्यातील 5 लाखांची रक्कम काढून घेतली. दुसऱ्या घटनेत युवकाने महिलेला फोन करून ‘तूच माझी आई आहेस. मी तुला गिफ्ट, सोने देणार आहे,’ अशी बतावणी करत 4 लाखाची ऑनलाईन फसवणूक केली. दोन्ही घटनांबाबत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
यातील पहिले तक्रारदार साताऱ्यातील 80 वर्षांचे वृद्ध आहेत. एका कंपनीतून ते निवृत्त झाले आहेत. 18 सप्टेंबर रोजी ते घरात एकटेच असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. व्हिडीओ कॉलवर बोलणाऱ्या समोरील व्यक्तीने पोलिस ड्रेस परिधान केला होता. कुलाबा पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगून बतावणी करण्यास सुरुवात केली. वृध्दाने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले.
मात्र पुन्हा काही वेळाने व्हिडीओ कॉलवर फोन आला असता संशयिताने ‘तुमच्या बँक खात्यावर बेनामी पैसे आले असून ते दहशतवादासाठी वापरले गेले आहेत. यामुळे तुम्हाला अटक निश्चित होणार,’ असे सांगितले. तसेच ‘या व्हिडीओ कॉलबाबत कोणालाही सांगायचे नाही. इतर सोशल मीडियावर सक्रीय राहायचे नाही. कुटुंबियांना, मित्रांना, पोलिसांना याची माहिती द्यायची नाही. सीबीआयचे पोलिस बाहेर तुमच्यावर वॉच ठेवून आहेत. थांबलेल्या खोलीत दुसरे कोणाला येवू द्यायचे नाही. अटक टाळण्यासाठी गुगल पे वरुन पैसे पाठवा. जाबजबाब झाल्यानंतर तुमची चूक नसेल तर तुम्हाला तुमचे पैसे परत पाठवले जातील,’ असा हिंदी, इंग्रजीमध्ये सायबर चोरट्यांनी संवाद केला. दि. 18 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत फसवणुकीची घटना सुरु होती. जाबजबाब झाल्यानंतरही गुगल पे वर पैसे येत नसल्याने अखेर वृध्दाने मुलाला घडत असलेल्या घटनेची माहिती देत पोलिसांकडे धाव घेतली.