

महाबळेश्वर : महाबळेश्वर पर्यटनस्थळी एकाहून एक डोळ्याची पारणं फेडणारी निसर्गरम्य अशी प्रेक्षणीयस्थळे असून काही अजूनही दुर्लक्षित आहेत. यामधीलच एक चहुबाजूंनी झाडांचा हिरवागार गालिचा अंथरलेला कॅनॉट पीक पॉईंट होय. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या पॉईंटचा सोयी सुविधांचा वनवास संपलेला नाही. यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे.
महाबळेश्वरच्या घनदाट जंगालात कॅनॉट पीक पॉईंट आहे. या पॉईंटवर जाण्यासाठी केलेल्या पायर्या तुटल्या आहेत. वाटेवर झाडेझुडपे वाढली आहे. यामुळे सुंदर जागेचे सौंदर्य नष्ट झाले आहे. चालताना अपघात होत आहेत. अनेक हौशी पर्यटक या प्रेक्षणीय स्थळांवर भेट देतात. येथे असलेली निरव शांतता, खाली दूरवर दिसणारा हिरवा गालीचा व विहंगम सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक भेट देतात. मात्र, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे या पॉईंटची दुरवस्था झाली आहे. पर्यटकांना बसण्यासाठी असलेले ब्रिटीशकालीन संरक्षक कठडे देखील आता पूर्णपणे तुटले असून साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही. झाडेझुडुपे वाढल्याने पर्यटकांना सरपटणार्या प्राण्यांची संख्या वाढली आहे. बसण्यासाठीची व्यवस्था नसल्यामुळे पर्यटक आल्यापावली पुन्हा परत जातात
या पॉईंटच्या उंचावरून सौंदर्य न्याहाळण्यासाठी बांधलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे टॉवरचे काम देखील अपूर्ण आहे. हा सांगाडा आता धोकादायक झाला असून तरीही यावर चढून निसर्गसौंदर्य पाहत आहेत. मात्र, यातून मोठा अपघात होण्याची भीती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कॅनॉटपीक पॉईंटकडे जाणार्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. वन विभागाने हे काम न केल्याने पालिकेने हे काम केले. त्यामुळे वन विभागाकडून जे शुल्क घेतले जाते त्या निधीचे होते तरी काय? असा सवाल केला जात आहे.
महाबळेश्वर परिसरातील प्रसिद्ध लॉडविक पॉईंट, मुंबई पॉईंट, विल्सन पॉईंट, बॅबिंग्टन पॉईंट, कॅनॉट पीक पॉईंट, लिंगमळा धबधबा अशी प्रेक्षणीय स्थळे वन विभागाच्या अखत्यारीत आहेत. या पर्यटनस्थळांकडे जाणार्या रस्त्यांची कामे पालिकेने केली आहेत. यामुळे पर्यटकांची सोय झाली. वन विभागाकडे या कामांसाठी निधी नसेल तर या पर्यनस्थळांचे पालिकेकडे हस्तांतरण करावे, अशी ही मागणी होत आहे. यामुळे पर्यटनस्थळांची देखभाल दुरुस्ती चांगली होईल, अशीही चर्चा आहे.