

सातारा : सातार्याजवळ असलेल्या मुलांच्या वसतिगृहामध्ये (होस्टेल) 17 वर्षीय मुलाने गळफास घेऊन जीवन संपविले. ‘त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या युवतीवरील प्रेमाला विरोध होईल व अभ्यासाचे टेन्शन’ अशा आशयाची चिठ्ठी तयार करून ती वडिलांना व्हॉटस्अॅपवर पाठवले असल्याचे समोर आले आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित 17 वर्षीय मुलगा मूळचा पाटण तालुक्यातील आहे. सातार्याजवळ वसतिगृहात राहून तो शिक्षण घेत होता. शुक्रवारी तो दिवाळी सुट्टी संपवून परत वसतिगृहात आला होता. मात्र, त्याने दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री चिठ्ठी लिहून ती वडिलांच्या व्हॉटस्अॅपवर पाठवली. मात्र वडिलांनी ती चिठ्ठी दुसर्या दिवशी वाचली. त्यावेळी त्यांना धक्का बसला. कॉलेजवर फोन करून माहिती घेतली असता, त्यानंतर ही घटना समोर आली.
सातारा तालुका पोलिसांना घटना समजल्यानंतर त्यांनी धाव घेतली. मुलाचे कुटुंबीय आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह सिव्हिलमध्ये नेला. पोलिसांनी सर्व प्राथमिक चौकशी करून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना दिला. दरम्यान, कॉलेज सोमवारपासून सुरू होत असताना मुलगा शुक्रवारीच घरी खोट सांगून कॉलेजच्या होस्टेलवर आला होता. हॉस्टेलमध्ये इतर कोणी मुले नसल्याने ही घटना समोर येण्यास वेळ गेला. या घटनेचा पुढील तपास पोनि. नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार किरण निकम करत आहेत.
मृत मुलाला बहीण असून तिचे एका मुलावर प्रेम आहे. मात्र, कुटुंबीयांकडून मुलीच्या प्रेमाला विरोध आहे. अशातच या मुलाचेही त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या युवतीवर प्रेम जडले होते. मात्र, कुटुंबीयांकडून आपल्या प्रेमालाही बहिणीप्रमाणेच विरोध होईल. तसेच अभ्यासाचे असलेले टेन्शन, यातून मुलाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.