सातारा : पुढारी वृत्तसेवा
गणेश उत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे गणेशमूर्तीं व देखावे होय. गौरी विसर्जन झाल्यामुळे महिलावर्गाची लगबग थांबली असून गणेशभक्त सार्वजनिक गणेश मंडळांच्या दर्शनासाठी बाहेर पडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे खुले झाले आहेत. गणेशभक्तांची पावले देखावे पाहण्यासाठी थबकू लागली आहेत. अनेक मंडळांमध्ये विद्युत रोषणाईचा झगमगाट होत असून काही मंडळांनी ज्वलंत विषयावरील देखाव्यांवर भर दिला आहे.
गणेशोत्सवात समाजप्रबोधनाचे उत्तम व्यासपीठ असल्याने देखाव्यांवर भर दिला जातो. हे देखावे पाहण्यासाठी व गणेश दर्शनासाठी ग्रामीण भागातील गणेशभक्त मोठ्या संख्येने येतात. देखाव्यामध्ये स्थानिक कलाकार व कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाते. यामुळे कार्यकर्त्यांच्या कलागुणांनाही वाव मिळतो. पथनाट्ये, नाटक, या माध्यमातून समाजप्रबोधन केले जाते. यातून एक सामाजिक कार्यकर्ताही घडवला जात असतो. कार्यकर्त्यांना वयाचे बंधन नसते. अनेक कार्यकर्ते कॉलेज, नोकरी, कामधंदा सांभाळून नेमून दिलेली कामगिरी पार पाडत असतात. पुन्हा सायंकाळी देखावे व इतर नियोजनासाठी ते मंडपाजवळ हजर असतात.
गौरी विसर्जनानंतर घरगुती उत्सवाची धांदल कमी झाल्याने महिलांना थोडी उसंत मिळणार आहे. गणेशोत्सव मध्यावर आल्याने गणेशदर्शनासाठी गणेशभक्तांची पावले घराबाहेर पडू लागली आहेत. गणेशभक्तांची वर्दळ वाढू लागल्याने सातारा शहरातील गणेश मंडळांचे देखावे खुले झाले आहेत. यावर्षीदेखील सातारा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी ज्वलंत विषयावरील जीवंत देखावे सादर करण्यावर भर दिला आहे. काही गणेश मंडळांमध्ये हालते देखावे तर काही मंडळांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाईचा झगमगाट पहायला मिळत आहे. हटके साजावट व भव्य गणेशमूर्तीदेखील गणेशभक्तांचे आकर्षण ठरत आहे.
गणेशोत्सव अकरा दिवसांचा असला तरी सहा दिवस उलटले आहेत. मंगळवार दि. 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाने उत्सवाची सांगता होणार आहे. काही मंडळाच्या विसर्जन मिरवणुका एक दिवस अगोदरच निघतात. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी व सादर करण्यासाठी अवघ्या पाच दिवसांचा कालावधी मंडळांना मिळणार आहे.