सातारा : वाईत सावकारावर बलात्काराचा गुन्हा | पुढारी

सातारा : वाईत सावकारावर बलात्काराचा गुन्हा

वाई (सातारा); पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एका गावातील सावकार दत्तात्रय गेणू शिंदे याने नात्यातीलच एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी शिंदे याच्यावर महिलेच्या पुरवणी जबाबानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील पीडित महिलेने शिंदे हा त्रास देत असल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच तिच्या पतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने पीडितेचा जीव वाचला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, या प्रकरणातील संशयित आरोपी दत्तात्रय शिंदे हा विना परवाना सावकारीचा धंदा करतो. यातूनच त्याने गोरगरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवत त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांच्यावरअत्याचार केल्याची चर्चा आहे. त्याच्याच नात्यातील एक महिला त्याच्या गावात राहते. त्या महिलेचा नवरा हा पुण्यात नोकरीस असल्याने ती एकटीच घरात असते.

याचाच गैरफायदा घेत शिंदे याने दि. 2 जून रोजी तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना उघडकीस आल्यास अब्रू जाईल या भीतीने पीडित महिलेने याची कुठेही वाच्यता केली नाही. एकदा अत्याचार केल्यानंतर त्याची कुठेही तक्रार न झाल्याने शिंदे याने पुन्हा दि. 7 जुलै रोजी पुन्हा त्याच महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला.

एक महिन्यात सलग दुसर्‍यांदा हा गैरप्रकार झाल्यानंतर मात्र पीडित महिलेने या घटनेची माहिती तिच्या पतीला दिली. यामुळे शिंदे याने पीडित महिलेचा मोबाईल फोडून टाकला. पीडितेचा पती घरी आल्यानंतर तिने सर्व झालेला प्रकार त्याला सांगितला.

हा प्रकार आयुष्य उद्ध्वस्त करणारा असल्याने या नैराश्यातून पीडित महिलेने विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तिला पतीने तात्काळ वाईतील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती पीडितेच्या पतीने वाई पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील संशयित दत्तात्रय शिंदे याची माहिती पोनि आनंदराव खोबरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी हवालदार बी. एस. धायगुडे, एस.जी. धुळे यांच्यासह जावून शिंदे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Back to top button