medical college : मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रियेस परवानगी | पुढारी

medical college : मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रियेस परवानगी

सातारा : पुढारी वृत्तसेवा; उपमुख्यमंत्री ना. अजित पवार सोमवारी सातारा जिल्हा दौर्‍यावर होते. या दौर्‍यात एकीकडे अनेक विकासकामे मार्गी लागली तर दुसरीकडे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने सातारा मेडिकल कॉलेजच्या 2021-22 साठी प्रथम वर्षाकरता 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मंजुरी दिली. त्यामुळे एकीकडे कामांचा सपाटा अन् दुसरीकडे मेडिकल कॉलेज प्रवेशाला मंजुरी मिळाल्याने अजितदादांचा दौरा सातार्‍यासाठी शुभशकून ठरला.

ना.अजित पवार यांचा सातारा दौरा शुभशकून : पहिल्या वर्षी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश

सातारा येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास शासनाने यापूर्वीच परवानगी दिली आहे. यानंतर आता 2021-22 या वर्षात प्रथम वर्षासाठी 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया राबवण्यासही मान्यता दिली आहे. सोमवारी सायंकाळी याबाबतचा आदेशच वैद्यकीय शिक्षण विभागाकडून काढण्यात आला. महाविद्यालयात प्रवेश क्षमता 100 विद्यार्थ्यांची राहणार आहे. या अभ्यासक्रमास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचे संलग्नीकरण प्राप्त करून घ्यावेत आणि त्यानंतरच प्रवेश करण्यात यावेत. राज्य सरकार, केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता निश्‍चित करण्यात आलेली कार्यपद्धती अवलंबण्यात यावी. केंद्र शासन, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली व राज्य शासनाने वैद्यकीय अभ्यासक्रमांबाबत वेळोवेळी केलेल्या नियमांचे पालन करणे मेडिकल कॉलेजला बंधनकारक राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शासनाने मान्य केलेल्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश देण्यात येऊ नयेत. केंद्र शासनाने दिलेली परवानगी ही सन 2021-22 वर्षाकरता असून त्यानंतर दरवर्षी परवानगीचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी प्रवेश करण्यापूर्वी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या परवानगीचे नूतनीकरण करून घेणे बंधनकारक राहणार आहे.

सातार्‍याच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न रखडला होता. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यामुळे मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागला. जागा मिळवून देण्यापासून ते कोट्यवधींचा निधी त्यांनी मंजूर केला. सोमवारी ते दौर्‍यात असतानाही सिव्हीलच्या आवारात प्रयोगशाळेचे भूमिपूजनही त्यांच्याच हस्ते झाले. त्याच दिवशी कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेलाही परवानगी मिळाली. हा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने अजितदादांचा दौरा हा सातार्‍यासाठी शुभशकुन ठरला.

हेही पाहा; तुमचा डायबेटीस पूर्णता बरा करणारी ही कोणती उपचारपद्धती आहे? | डॉ. जगन्नाथ दीक्षित

Back to top button