लाच प्रकरण : क्‍लास २ अधिकार्‍याला अटक | पुढारी

लाच प्रकरण : क्‍लास २ अधिकार्‍याला अटक

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : पगारासह इतर भत्त्याचा फरक काढून देण्यासाठी लाचेची मागणी करून एक हजाराची रक्‍कम स्वीकारल्याप्रकरणी क्‍लास 2 अधिकारी असणारा वाईचा उपकोषागार अधिकारी सुधाकर शंकर कुमावत (वय 41, मूळ रा. विलास सोसायटी, ससाणेनगर, हडपसर, पुणे सध्या रा. वाई, जि. सातारा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. दरम्यान, एसीबीच्या या कारवाईने सातार्‍यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे सरकारी नोकरदार आहेत. तक्रारदार यांचा गेल्या 3 महिन्यांपासून पगार अडकला होता. त्यांचा 20 वर्षांचा लाभ, सातवा वेतन आयोगाचा फरक असे एकूण 2 लाख 77 हजार 685 रुपयांचे बिल पेंडिंग होते.

याकामासाठी तक्रारदार हे उपकोषागार सुधाकर कुमावत याला वाई येथील त्यांच्या कार्यालयात भेटले. संबंधित माहिती दिल्यानंतर कुमावत याने सर्व रक्‍कम काढण्यासाठी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा एसीबी कार्यालयात तक्रार दिली.

एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करुन सहकार्‍यांना तपास करण्याच्या सूचना केल्या. एसीबी विभागाने तपासाला सुरुवात केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार तडजोडीअंती 2 हजार रुपये लाचेची रक्‍कम निश्‍चित झाली.

लाचेची रक्‍कम सोमवारी स्वीकारणार असल्याने एसीबी विभागाने वाई येथे ट्रॅप लावला. दुपारी कुमावत याने लाचेतील 1 हजार रुपये स्वीकारल्यानंतर वाईसह सातार्‍यात खळबळ उडाली. कोषागार विभागातील अधिकारी सापडल्याची माहिती पसरल्यानंतर बहुतेक अधिकारी गांगरले. एसीबीने पंचनामा करुन वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. रात्री उशीरा सुधाकर कुमावत याला अटक करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

पुणे, वाईत घरझडती सुरू..

सोमवारी ट्रॅप केल्यानंतर सातारा एसीबीने सुधाकर कुमावत याच्या वाई व पुणे येथील घरावर धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत घरझडती सुरू होती. त्याच्याकडे सापडलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू होती. दरम्यान, एसीबी विभागाने कुमावत याच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याला मंगळवारी न्यायालयात पोलिस कोठडीसाठी हजर केले जाणार आहे.

Back to top button