अभयसिंहराजे यांचे मंत्रिपद घालवणार्‍यांसोबत तुम्ही कसे? | पुढारी

अभयसिंहराजे यांचे मंत्रिपद घालवणार्‍यांसोबत तुम्ही कसे?

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : स्व. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना अभयसिंहराजे यांना मी स्वत: शरद पवार यांची भेट घालून दिली होती. त्यावेळी अभयसिंहराजे यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करावे, अशी माझी इच्छा होती. ज्यावेळी मंत्रिपदाचा निर्णय झाला तेव्हा अभयसिंहराजे यांच्या मंत्रिपदासाठी शिफारस करणारा आ. शशिकांत शिंदे हा एकमेव आमदार होता.

त्यावेळच्या ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये ज्येष्ठ मंडळी साक्षीला होती. ज्यांच्यामुळे अभयसिंहराजेंचे मंत्रिपद गेले त्यांच्याबरोबर तुम्ही आता काम कसे करता? असा प्रतिसवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. शशिकांत शिंदे यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर पुन्हा पलटवार केला आहे. दरम्यान, खा. उदयनराजे भोसले राष्ट्रवादीतून दोनवेळा निवडून आले होते. मात्र, भाजपात गेल्यानंतर त्यांना पराभव पत्कारावा लागला असून त्यांचा राजकीय तोटा झाला आहे, असेही आ. शशिकांत शिंदे म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. शशिकांत शिंदे यांनी अनेक प्रश्‍नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांना जिल्हा बँकेच्या निकालानंतर तुम्ही शांत झाला का? असे विचारले असता आ. शिंदे म्हणाले, मी सरळ राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. मला फार मोठे बॅकग्राऊंड नाही. खा. शरद पवार यांनी राजकीय व्यासपीठ मिळवून दिले. माथाडींच्या नेत्यापासून आमदार व मंत्र्यांपर्यंत त्यांनी संधी दिली. पक्षवाढीची जबाबदारी पडल्यानंतर मी शांत झालो.

गाफील ठेवून तुमचा पराभव केला का? असे विचारले असता आ. शिंदे म्हणाले, विधानसभेपासून बँकेपर्यंत जे राजकारण पाहिले त्यानंतर उघड बोलणे गरजेचे आहे असे वाटले. एकीकडे मला गुंतवून ठेवायचे व दुसरीकडे विरोध केल्यानेच माझा बँकेत पराभव झाला. सुरूवातीलाच विरोध असल्याचे सांगितले असते तर तशी मी तयारी केली असती.

राजे लोकांशी जमत नाही याचे कारण काय? असे विचारले असता आ. शिंदे म्हणाले, मी सर्वांशी जमवून घेतले. पक्षवाढीसाठी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारखा कार्यकर्ता वाढावा किंवा नाही हा जनतेच्या हातातील निर्णय आहे. त्यांच्या हातामधील नाही. मी कधीच कोणाला विरोध केला नाही. पक्षाच्या विरोधात भूमिका घेईल त्याच्या विरोधात मी भूमिका घेतो. मागील निवडणुकीत ना. रामराजे व माझ्यात चर्चा झाल्यानंतर शिवेंद्रराजेंना अध्यक्ष करायचे ठरले होते. ते अध्यक्ष व्हावे यासाठी मी मनापासून प्रयत्न केले. मात्र, माझ्या शिफारशीच्या वक्‍तव्याचा ते उलटा अर्थ काढत असतील तर त्याला मी काहीही करू शकत नाही, असेही आ. शिंदे म्हणाले.

शिवेंद्रराजेंना जशी ऑफर दिली तशी तुम्ही उदयनराजेंना देणार का? असे विचारले असता आ. शिंदे म्हणाले, उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडल्याने त्यांचा राजकीय तोटा झाला. ज्या पक्षात फार मोठा मान सन्मान होता तो त्यांनी घालवला. राष्ट्रवादीत दोनवेळा निवडून आले. अपक्ष असताना व राष्ट्रवादी सोडल्यानंतरही त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनेक चेहरे आहेत जे लोकसभेतून पुढे जातील. शरद पवार व अजितदादांवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे. राष्ट्रवादीचा कोणताही चेहरा उभा राहिल्यास व पक्षाशी आम्ही एकसंघटीत भूमिका घेतल्यास 1999 प्रमाणे सर्व जिल्हा राष्ट्रवादीमय होऊन जाईल, असा विश्‍वासही आ. शिंदे यांनी व्यक्‍त केला.

अभयसिंहराजे यांची साथ अचानक सोडली का? असे विचारले असता आ. शिंदे म्हणाले, स्व. अभयसिंहराजे राजकारणातील आदरणीय नेतृत्व होते. चांगले व्यक्‍तिमत्व होते. 1999 मध्ये 19 जण विधानसभेला इच्छुक होते. तेव्हा मी 12 हजार 500 मतांनी निवडून आलो. मी ज्यांच्या जीवावर निवडून आलो त्यांना मी विसरणार नाही. अभयसिंहराजेंबरोबर मी कायम होतो. त्यांच्यात व माझ्यात प्रेम व आपुलकी होती.

पहाटेच्या शपथविधीमुळे तुमचा पराभव झाला व त्यामध्ये अजितदादांचा सहभाग आहे असा आरोप होतो त्यात किती तथ्य आहे? असे विचारले असता आ. शिंदे म्हणाले, नाही. जिल्ह्यामध्ये नेत्यांमध्ये गट नाहीत. नेत्यांवर प्रेम करणे व निष्ठा दाखवणे हा गुन्हा नाही. अजितदादांचा स्वभाव हा परखड आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मला सहानुभूती दाखवली. त्यामुळेच विधानपरिषदेवर मला घेतले. माझ्या पक्षात कोणतीही दुफळी नाही.

त्यांच्याकडून नावाचा वापर करून दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेतृत्व व पक्ष म्हणून काम करतो. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला ताकत देण्याचे काम नेतेमंडळी करत असतील तर त्यात चुकीचे काय? असा प्रश्‍नही आ. शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. जिल्ह्यात पक्षाला काही अडचण वाटत असेल तर त्यात माझा काही दोष नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा काहीही त्याग करण्याची तयारी माझी असेल, असेही ते म्हणाले.

जिल्हा बँकेवर एखादा उमेदवार निवडून गेल्यानंतर भाजपचा प्रदेशाध्यक्ष भेटायला जातो. त्यामुळे भाजपचे माझ्यावर किती प्रेम होते हे पहा. त्यावेळीही तसेच प्रेम भाजपचे माझ्यावर होते. त्यावेळी ज्या पध्दतीने राजकारण केले त्याची कुणकुण लागली होती. नवीमुंबई, लोकसभेची पोटनिवडणूक यामुळे खूप धावपळ झाली. त्यामुळेही विधानसभेला पराभव झाला, असेही ते म्हणाले.

वेळ आली तर घरी बसवू असा इशारा शिवेंद्रराजे देत आहेत, असे विचारले असता आ. शिंदे म्हणाले, माझ्या पाठिमागे माझा नेता व पक्ष ठाम आहे. त्यामुळे मी कुठल्याच परिणामाला घाबरत नाही. मला कुणाला आव्हान करायचं नाही. त्यांना मी मागे सांगितल आहे. राष्ट्रवादीत आला तर तुमचं काम मी नक्‍की करेन. जावली व सातार्‍यात हस्तक्षेप करत असल्याचे त्यांना वाटत असेल. पण पक्षवाढ करणे ही माझी जबाबदारी असून त्यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही. मला पक्ष सांगेल तिथे काम करण्याची तयारी आहे. पक्षाशी बांधिलकी डावलून निर्णय घेणार नाही, असेही ते म्हणाले.

अजितदादांनी शिवेंद्रराजेंना ताकद देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही भविष्यकाळात राष्ट्रवादीत या. सातारा-जावली मतदारसंघात जो राष्ट्रवादीचा उमेदवार येईल त्याचेही काम मला करावेच लागणार आहे. तुम्ही पक्षात आल्यास पक्ष म्हणून तुमचेही काम मी नक्‍की करेल, अशी ग्वाहीही आ. शिंदे यांनी दिली. यावर राष्ट्रवादीत येण्याचा सल्‍ला ते ऐकतील का? असे विचारले असता आ. शिंदे म्हणाले, पर्याय उभे करण्याचा प्रयत्न मी करतोय शेवटचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.

भविष्यात पक्षीय संघर्ष राहिल का? असे विचारले असता आ. शिंदे म्हणाले, मी पक्ष ही भूमिका एकनिष्ठेने पार पाडतो. पक्षासाठी अनेकांना विरोधात घेतले आहे. उदयनराजे राष्ट्रवादीत असताना त्यांच्याबरोबर होतो तर भाजपमध्ये असताना विरोधात मीच गेलो होतो. पक्षामुळे पाटणमध्ये ना. शंभूराज देसाई व माणमध्ये आ. जयकुमार गोरे दुखावले असतील. पक्षवाढीसाठी मी आक्रमक प्रयत्न करतो हे काहींना अडचणीचे ठरते त्यातून संघर्षही होवू शकतो, असा इशाराही आ. शिंदे यांनी दिला.

विधानसभेला माझा ओव्हर कॉन्फिडन्स नडला…

पावसाच्या सभेचा चमत्कार राज्यात झाला असला तरी तुमच्या मतदारसंघात का झाला नाही? असे विचारले असता आ. शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत खा. शरद पवार हे कल्याण रिसॉर्टला आले असताना युवकांनी मोठी गर्दी केली होती. हाच ओव्हर कॉन्फिडन्स मला नडला, असे सांगत आ. शशिकांत शिंदे यांनी प्रथमच जाहीर कबुली दिली. भाजप व इतर पक्ष मला लक्ष करत असल्याचे दिसून आले. इतके होऊनही अल्पमताने मी पडलो. जे बँकेला झाले तेच विधानसभेलाही झाले. त्या काळातही पडद्यामागे व पडद्यापुढे सूत्रे हलली. भाजपच्या बैठका कुठे कुठे झाल्या हे मला माहीत होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

Back to top button