सातारा : दहिवडी नगरपंचायत निवडणूक, लढतींबाबत तर्क-वितर्क | पुढारी

सातारा : दहिवडी नगरपंचायत निवडणूक, लढतींबाबत तर्क-वितर्क

दहिवडी : राजेश इनामदार

दहिवडी नगरपंचायतीची निवडणूक दि. 21 डिसेंबर रोजी होत असून कोण कुठल्या प्रभागातून उभा राहणार याच्यासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. प्रबळ उमेदवार देण्यावर राजकीय पक्षांचा भर दिसत असून दहिवडीची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण पडले नसल्याने अनेकजण हिरमुसले आहेत. जिल्हा बँकेला राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप एकत्र आले.त्याचे काही पडसाद या निवडणुकीत उमटणार का? अशा अवघडलेल्या विचित्र परिस्थितीत ही निवडणुकीत होत असल्याने मतदारांचाही गोंधळ उडू शकतो.

अनेक दिवसांपासून दहिवडी नगरपंचायत निवडणूक कधी लागणार याबाबत जनतेमध्ये उत्सुकता होती. राजकीय पक्षही जानेवारीत निवडणूक लागेल असे तर्क लावत असतानाच अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची पळापळ सुरु झाली आहे. आरक्षण अगोदरच जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये कोणत्या प्रभागातून उभे राहायचे याबाबत चाचपणी सुरु झाली आहे. अनेकांचे प्रभाग राखीव झाल्याने ते कोणता प्रभाग आपल्याला लाभदायक ठरेल याची चाचपणी करत आहेत. काही ठिकाणी एका जागी तीन-तीन उमेदवार इच्छुक असल्याने नेतेमंडळींची डोकेदुखी वाढणार आहे.

दहिवडी नगरपंचायतीची राजकीय सद्यस्थिती पाहता भारतीय जनता पार्टीची आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असून त्यांचे अकरा नगरसेवक तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा नगरसेवक आहेत. गतवेळी दुरंगी लढत झाली होती. त्यावेळी शेखर गोरे राष्ट्रवादीमध्ये होते आता ते शिवसेनेत आहेत.

त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. हरणाई सूतगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस ही निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत असून त्यांची ही चाचपणी सुरु झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बाजार समितीला एकत्र लढले होते. या निवडणुकीत दोन्ही पक्षांची काय भूमिका राहणार याकडेही जनतेचे लक्ष आहे.

तसेच वंचित आघाडीचे उमेदवारही काही ठिकाणी उभे राहण्याची शक्यता आहे. दि. 1 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून दि. 7 डिसेंबरही अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. तोपर्यंत दुरंगी किंवा तिरंगी याबाबतचा फैसला होऊन जाईल. निवडणूक आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून अनेक इच्छुक सर्वच राजकीय पक्षांकडे फेर्‍या मारताना दिसत आहेत. दहिवडीमध्ये एकूण 12 हजार 750 मतदार आहेत. तेच 17 नगरसेवक निवडून देणार आहेत.

Back to top button