स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी | पुढारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी

हाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा

राज्यात एका विशिष्ट घटकांना पुढे घेवून चाललो आहोत. त्यामुळे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष म्हणून लढवायच्या की महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवायच्या याबाबत विविध घटकांशी चर्चा करणार आहोत. एकत्रीकरणाबाबतच्या स्थितीचा अभ्यास करुन धोरण ठरवू, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी महाबळेश्वर येथे पत्रकार परिषदेत दिली. एकप्रकारे त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे संकेत दिले. तसेच एस. टी. कर्मचार्‍यांचा प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वासही व्यक्त केला.

दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सिरिअसली (गांभीर्याने) लढायला पाहिजे होती, अशा शब्दात पवारांनी शिंदे यांच्या पराभवाचे विश्लेषण केले. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीचे धोरण ठरवताना सातारा बँकेत यांनी काय केले? याचा मला उपयोग होईल, असा टोलाही पवारांनी लगावला.

महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्यस्तरीय शिबिरासाठी ते उपस्थित होते. गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचाही पराभव झाला. महाविकास आघाडी म्हणून तुम्ही काहीच केले नसल्याचा त्यांचा आरोप असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना खा. शरद पवार म्हणाले, जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची असे ठरलेच नव्हते.

crystals! स्फटिकांचे मोठे स्तंभ!

तशी परिस्थिती इथे नव्हती. आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवाबाबत विचारलेल्या प्रश्नावर खा. पवार म्हणाले, शशिकांत शिंदे यांच्या पराभवाच्या खोलात गेलो नाही. मात्र ही निवडणूक शिंदे यांनी अधिक गांभीर्याने घेणे अपेक्षित होते. सहकारी संस्थांच्या निवडणुका पक्ष घेत नसतो.

राष्ट्रवादी भवनावर झालेल्या दगडफेकीबाबत बोलताना खा. पवार म्हणाले, कधी कधी पराभवामुळे तरुण कार्यकर्ते बिथरतात आणि त्यांच्याकडून असली चूक होते. याबाबत स्वत: आ. शशिकांत शिंदे यांनीच दिलगिरी व्यक्त केल्याने विषय संपला आहे, असे सांगून पवारांनी या विषयावर पडदा टाकला.कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयाबाबत खा. पवार म्हणाले, शेतकर्‍यांच्या संदर्भात धोरण ठरवताना त्यांची चर्चा सदनात होत नाही. काही दिवसात शेजारच्या राज्याच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकांमध्ये कसं होईल, या धास्तीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

एस. टी. कर्मचार्‍यांच्या वेतनवृद्धीच्या प्रश्नावर मार्ग सुचवला….

एस. टी. कर्मचार्‍यांच्या संपाबाबत बोलताना खा. शरद पवार म्हणाले, पाच राज्यांचे एस. टी. कर्मचार्‍यांचे वेतन तपासलं. गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांच्या कर्मचार्‍यांचा अभ्यास केला तर गुजरातच्या कर्मचार्‍यांचे वेतन हे महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. बाकी इतर राज्यांचे वेतन हे महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. त्यामुळे वेतनवृद्धी हा काही मार्ग असू शकतो का? या मार्गावर चर्चा करायचा पर्याय राज्य सरकारला सुचवला. विलनीकरणाबाबत काय निर्णय होतो ते हायकोर्टाने जी समिती नेमली आहे ती घेईल. पण एसटीचे विलिनीकरण केल्यास इतर महामंडळांचेही विलिनीकरणही करावे लागेल.

1 एस. टी. कर्मचार्‍यांचा प्रश्न लवकरच सुटेल
2 पक्षातील व घटक पक्षातील नेत्यांशी चर्चा करुन निवडणुकांचे धोरण
3 सातारा बँकेत जसं जमवलं त्याचा राज्यात उपयोग करुन घेणार
4 सातारा जिल्हा बँकेची निवडणूक पक्षविरहीत

 

Back to top button