सातारा : बिबट्या नरभक्षक तर झाला नाही ना? | पुढारी

सातारा : बिबट्या नरभक्षक तर झाला नाही ना?

ढेबेवाडी : विठ्ठल चव्हाण

येणके येथे चार दिवसांपूर्वी पाच वर्षांच्या बालकाचा बिबट्याने बळी घेतला आहे. या घटनेमुळे 14 वर्षांपूर्वी येणके येथे घडलेल्या थरारक घटनेच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात 7 ते 8 लोक जखमी झाले होते.

त्यामुळेच आता येणके परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून चिमुकल्याचा बळी घेणारा बिबट्या नरभक्षक तर झाला नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मागील काही वर्षांत बिबट्यासह वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर चिंताजनक बनला आहे. दीडमहिन्यापूर्वी तांबवे परिसरातही लहान मुलावर बिबट्याकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.

याशिवाय चचेगाव, सुपने, वनवासमाची (खोडशी), जखिणवाडी, धोंडेवाडी, तांबवे, ओंड, पाचवड फाटा, तारूख, बामणवाडी, मुनावळे, मलकापूरमधील आगाशिवनगर या परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होते. येणके परिसरातील ग्रामस्थांच्या मनात वनखात्याच्या कार्यपद्धतीबाबत संताप दिसून येत आहे आणि वनविभागाच्या द‍ृष्टीने हे चिंताजनकच वाटते. संतप्त ग्रामस्थानी दिलेल्या माहितीनुसार, 2006 साली याच शिवारात बिबट्याने 7 ते 8 जणांवर हल्ले करून जखमी केले होते.

त्यावेळी दोन महिने वनविभागाकडे पाठपुरावा करूनही कोणतीच कारवाई झाली नव्हती. वनविभागाककडून बिबट्याने कुणा माणसाला ठार मारलय का? सापळा लावायला नागपूरवरून परवानगी घ्यावी लागते. कुत्री मारली, शेळ्या मारल्या तर सापळे लावण्याची गरज नाही, अशी उत्तरे दिली जात होती.

ग्रामपंचायतीने लेखी मागणी करूनही वनविभागावर काहीच फरक पडला नसल्याचा स्थानिकांचा दावा आहे. आता जाग आलेल्या वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. ढेबेवाडी विभागातील काही अपवाद वगळता सर्व वाल्मिकी पठार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट आहे. पठारावरील वाड्यावस्त्या व गावे अशा मानवी वसाहती बफर झोनमध्ये आहेत.

व्याघ्र प्रकल्पामुळे जंगली प्राणी संख्या वाढली आहे. त्यात अन्य वन्य प्राण्यांबरोबरच बिबट्यांची वाढती संख्या लक्षणीय आहे. पण बिबट्याची अन्न साखळी खंडित झाली आहे, ही बाब विचारातच घेतली गेलेली नाही. आता कराड तालुक्यातील येणके व तांबवे परिसरातील घटनांचे अवलोकन करताना बिबटे नरभक्षक झालेच तर काय करायचे? याचा विचार कुणी केलाय हे दिसून येत नाही.

शेतातील सर्व कामे पडली आहेत ठप्प

बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने आता शेतात दिवसाही काम करणे अवघड झाले आहे. उसाच्या शेतात बिबट्याचा वावर असल्याने काम करत असताना बिबट्या हल्ला करू शकतो, याचा विचार करूनच शेतकर्‍यांसह शेतमजुरांचा थरकाप उडत आहे. त्यामुळेच आता शेतातील कामे जवळपास ठप्प झाली असून बिबट्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढवली आहे.

मानव, बिबट्यामधील संघर्ष वाढण्याची शक्यता

येणके येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आगाशिव डोंगर परिसरातील गावांमधून अशा घटना टाळण्यासाठी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वाढू लागली आहे. स्थानिक शेतकर्‍यांमध्ये वन विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल संताप असून भविष्यात स्थानिक शेतकरी व वनविभाग यातील मतभेद कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास मानव व बिबट्या यांच्यातील संर्घष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाहा व्हिडिओ :  आठ दिवस टिकणाऱ्या मटण लोणच्याची रेसिपी

 

Back to top button