सातारा : येरळवाडी तलावात फ्लेमिंगोचे आगमन

कातरखटाव : केदार जोशी

कातरखटाव : केदार जोशी

खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पावर वाढत्या थंडीमुळे स्थलांतरित पक्षी मुक्कामास आल्याने किलबिलाट वाढला आहे. तसेच तलाव परिसरात पक्ष्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात दिसत असून सकाळी व सायंकाळी या पाहुण्यांचे निरीक्षण करण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले येरळा तलावाकडे वळू लागली आहेत. येरळवाडी मध्यम प्रकल्पात अनेक स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. यामध्ये सुमारे 25 ते 30 फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा विराजमान झाला आहे.

सध्या तलाव चित्रबलाक, करकोचा, कांडेसर, स्पून बिल, काळा शराटी, पान कावळा, खंड्या, कवड्या, कवड्या तुतारी, शेकाट्या, जांभळी पाणकोंबडी, चक्रवाक, नदीसुरय, सुतारपक्षी, ग्रे हेरॉन, चांदवा, कोतवाल आदी पाहुण्यांनी बहरला आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणांहून पक्षीप्रेमी तलाव परिसरात दाखल होत आहेत. पक्ष्यांच्या हालचाली पाहण्यासाठी सकाळी व सायंकाळी गर्दी होत आहे. दरम्यान, या सर्वांपेक्षा देखणा फ्लेमिंगो (रोहित, अग्निपंख) या परदेशी पाहुण्याची पक्षीप्रेमी वाट पाहत आहेत.

तलाव्यात पाणीसाठा असल्याने या पक्ष्यांना खाद्य खाण्यासाठी व बसण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली. तर तलाव परिसरात दलदलीच्या भागात फ्लेमिंगो पक्षी मासे कीटक, आटोलिया सारख्या वनस्पतींच्या शोधत मुक्तविहार करताना दिसत आहेत. त्यांच्या आकर्षक छबीचे क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकार व पक्षीप्रेमी तलावाकडे धाव घेत आहेत.

दरम्यान, दरवर्षी डिसेंबर महिना अखेर येरळवाडी तलावात फ्लेमिंगो पक्षी येत असतात. त्यांच्या निरीक्षणासाठी पक्षीप्रेमीही हजेरी लावतात. सध्या फ्लेमिंगो पक्षी नोव्हेंबरमध्येच आल्याने पक्षी प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.खटाव तालुक्यात वाढत्या गुलाबी थंडीच्या आगमनाबरोबरीने रंगाने गुलाबी असणार्‍या फ्लेमिंगोच्या (रोहित) आगमनाने पक्षीमित्रांची येरळवाडी तलावाकडे वर्दळ वाढली आहे.

खटाव तालुक्यातील येरळवाडी धरण व परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. फ्लेमिंगो, थापट्या बदक, भुवई बदक, लालसरी, दलदली हारिण, शेकाट्या इ. विविध देशी-स्थलांतरीत पक्ष्यांचा मुक्त संचार आहे. येरळवाडी धरणामध्ये सुमारे 140 पक्ष्यांच्या नोंदी ई- बर्ड वर झाल्या आहेत. हे ठिकाण स्थलांतरित पक्ष्यांचा कॉरिडॉर आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन होणे देखील गरजेचे आहे.
– डॉ. प्रविण चव्हाण, पक्षी अभ्यासक

पाहा व्हिडिओ : मिलिंद तेलतुंबडे नक्षलवादी कसा बनला

https://youtu.be/AKuoLpW0oO4

Exit mobile version