ST employees strike : वाहतूक नियंत्रकाला दगडाने मारहाण | पुढारी

ST employees strike : वाहतूक नियंत्रकाला दगडाने मारहाण

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यात एसटी कर्मचार्‍यांच्या संपात (ST employees strike) दुफळी निर्माण झाली असून संपाच्या नवव्या दिवशी त्याला गालबोट लागले. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण करीत दगड डोक्यात घालून रक्तबंबाळ केले. या सर्व घटनेमुळे सातारा बसस्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जखमीवर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत.

राज्यात सर्वत्र एसटी कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी बंद पुकारला आहे. मंगळवारी त्याचा नववा दिवस होता. दुपारी चार वाजता मात्र इन गेट परिसरात या संपाला गालबोट लागले. एसटीचा संप सुरूअसतानाही एसटी वाहक राजू पवार हे शिवशाही बस पुण्याला घेऊन गेले होते. यावर इतर संपकरी कर्मचार्‍यांनी बस का घेऊन गेला? अशी विचारणा त्यांना केली व त्यातूनच वादाला तोंड फुटले. किरकोळ बाचाबाची झाल्यानंतर पुढे त्याचे हाणामारीत पर्यावसन झाले. (ST employees strike)

सातारा बस डेपोमध्ये नियंत्रक म्हणून अमित चिकणे सेवा बजावत आहेत. वाहक नियंत्रकामध्ये शिवशाही नेण्यावरून वाद विकोपाला गेला व त्याचवेळी पवार याने चिकणे यांच्या डोक्यात दगड घातला. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. चिकणे या घटनेत जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व सिव्हिलमध्ये धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सातार्‍यात तडीपार गुंडाला अटक (ST employees strike)

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : तडीपारीची कारवाई केलेला रेकॉर्डवरील गुंड विकास मुरलीधर मुळे (वय 20, रा. पॉवर हाऊस झोपडपट्टी, मंगळवार पेठ, सातारा) याला सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने अटक केली.

विकास मुळे याच्यावर शहर पोलिस ठाण्यात चोरीचे तब्बल 9 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला ऑगस्ट 2021 मध्ये पोलिस अधीक्षकांनी 2 वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तडीपारीची कारवाई असतानाही तो सातार्‍यात खुलेआम फिरत होता. ही माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर डीबीच्या पथकाने सापळा लावला. या कारवाईत पोलिसांनी त्याला अलगद उचलले. संशयिताकडे अधिक चौकशी केली असता त्याने शहरात येण्यासाठी कोणाचीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्याविरुध्द तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोनि भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार समीर कदम, पोलिस हवालदार अविनाश चव्हाण, सुजित भोसले, अभय साबळे, सागर गायकवाड यांच्या पथकाने केली.

पोलिसांचे संपर्काचे आवाहन

सातार्‍यातून आमीर मुजावर (रा. परवाडी), आमीर शेख (रा. वनवासवाडी), प्रल्हाद पवार (रा. केसरकर पेठ, सातारा), जीवन रावते (रा. कोडोली), अभिजीत भिसे (रा. कोडोली), जगदीश मते (रा. शाहूपुरी), सौरभ जाधव (रा. मोळाचा ओढा), आकाश पवार (रा. सैदापूर) आदींना तडीपार केले आहे. यापैकी कोणीही फिरत असल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button