कराड ः चंद्रजित पाटील फिनलँडमधील हेलसिंकी येथे सन 1952 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये देशाला वैयक्तिक क्रीडा पहिले कांस्यपदक मिळवून दिले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करूनही स्व. पै. खाशाबा जाधव यांची राष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्याची इच्छा आज 39 वर्षांनंतरही अपूर्णच आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीकडून 95 गुंठे जागा जिल्हा क्रीडा अधिकार्यांच्या नावावर करून देण्यात आली आहे. मात्र, त्यापैकी 58 गुंठे जागा गायब आहे. तर उर्वरित 36 गुंठे जागा प्रशासनाच्या ताब्यात आहे. याशिवाय 14 वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही 1 कोटी 58 लाखांतून केवळ राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या वॉल कंपाऊंडचेच काम करण्यात आले आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची आज, सोमवार, दि. 14 रोजी पुण्यातिथी आहे. देशाला पदक मिळवून देणार्या या मल्लाला न्याय मिळायला अजून किती काळ जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Khashaba Jadhav)
हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये प्रथम अन्याय करून स्व. पै. खाशाबा जाधव यांना डावलण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर पतियाळाच्या महाराजांनी या विषयात लक्ष घालून ऑलिम्पिकमध्ये निवड झालेल्या मल्लांशी पुन्हा कुस्ती लावण्याची सूचना केली आणि यात खाशाबा जाधव यांनी बाजी मारत ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळविला होता. मात्र, त्यानंतर ऑलिम्पिकसाठी हेलसिंकीला जाण्यासाठी आवश्यक रक्कम नसल्याने लोकवर्गणी गोळा करण्यात आली. त्याचबरोबर प्राचार्य बाळासाहेब खर्डेकर यांनी स्वतःचे घर गहाण ठेवून आपला विद्यार्थी खाशाबांना 7 हजार रुपये दिले होते. अशाप्रकारे अडथळ्यांची शर्यत पार करत स्व. पै. खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत कांस्यपदक मिळविले होते. (Khashaba Jadhav)
14 ऑगस्ट 1984 मध्ये शेणोली येथील अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांनी आपले गुरू गोविंद नागेश पुरंदरे यांच्याकडे गोळेश्वरमध्ये नवोदित मल्लांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा आजही अपूर्णच आहे. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी स्व. खाशाबांचे पुत्र रणजित जाधव यांनी स्वतःच्या मालकीची 22 गुंठे जागा शासनाच्या नावे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर गोळेश्वर ग्रामपंचायतीने 95 गुंठे जागा देत ती जागा जिल्हा क्रीडा अधिकार्यांच्या नावे केली. यापैकी सद्यस्थितीत 58 गुंठे जागा कोठे आहे? हेच समजत नसून ती जागा गायब असल्यासारखीच परिस्थिती आहे. तर उर्वरित जागा शासनाच्या ताब्यात आहे. या जागेवर मागील 14 वर्षांतील पाठपुराव्यानंतर 1 कोटी 58 लाखांच्या निधीतून केवळ वॉल कंपाऊंड उभारण्यात आले आहे. त्यानंतर आजवर या क्रीडा संकुलाचे काम रखडले असून आजवर एकही साधी वीट चढविण्यात आलेली नाही. त्यामुळेच ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार? हा अनुत्तरित प्रश्न कायम आहे. (Khashaba Jadhav)