सांगा… श्रावणी आता माघारी येणार आहे का?; बसमध्ये जागा पकडण्यासाठीच्या गर्दीने श्रावणीला देवाघरी नेले

सांगा… श्रावणी आता माघारी येणार आहे का?; बसमध्ये जागा पकडण्यासाठीच्या गर्दीने श्रावणीला देवाघरी नेले
Published on
Updated on

सातारा : घरी जाण्यासाठी एस.टीची वाट पाहणार्‍या श्रावणी अहिवळे हिला बसमध्ये जागा पकडण्यासाठीच्या गर्दीने देवाघरी नेले. वाईच्या एस.टी. स्टँडमधील ही दुर्घटना काळजात कालवाकालव करून गेली. समाजमनाला सुन्न करणार्‍या या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले. एस.टी.मध्ये जागा पकडण्यासाठी दररोज सुरू असणारी विद्यार्थी व प्रवाशांची जीवघेणी चढाओढ थांबणार आहे का?. श्रावणी गेली, आता उपाययोजनांचे कागदी घोडे नाचवले जातील, नुकसान भरपाईची तजवीज केली जाईल, श्रावणीच्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्नही होईल. पण, खरोखरच श्रावणी माघारी येणार आहे का? जीवघेणी गर्दी श्रावणीसारखे आणखी किती बळी घेणार आहे?

श्रावणीच्या किंकाळ्या कुणालाच का ऐकू आल्या नाहीत?

वाईच्या एस.टी. स्टँडवर शनिवारी घडलेली दुर्घटना काळजाचा ठाव चुकवणारी होती. लवकर शाळा सुटल्याने घरी जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाई बसस्थानकात गर्दी केली होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री विद्यालयात इयत्ता सातवीत शिकणारी श्रावणी अहिवळे ही घराकडे जाणार्‍या बसची वाट पाहत उभी होती. गावाकडे जाणारी वाई-बालेघर ही बस लागल्यानंतर श्रावणी बसजवळ आली. मात्र, एस.टीत चढत असताना गर्दीमुळे ती खाली कोसळली अन् कायमची देवाघरी गेली. त्यावेळी तिच्या किंकाळ्या गर्दीत अन् बसमधील जागा पकडण्यासाठी सुरू असणार्‍या चढाओढीच्या वातावरणात विरून गेल्या. कुणालाही तिच्या किंकाळ्या ऐकू आल्या नाहीत. कारण त्या गर्दीतल्या प्रत्येकाला एस.टी.मध्ये बसण्यासाठी जागा पकडायची होती. श्रावणी जीवाच्या आकांताने बचावासाठी टाहो फोडत होती. पण कुणालाच काही समजत नव्हते. लाखमोलाचा जीव गर्दीमुळे हिरावून गेला. या दुर्घटनेने भेदरलेले वातावरण आता निवळेलही, पण श्रावणी परत येणार आहे का? त्या गर्दीला पश्चाताप होईलही, पण श्रावणीच्या आई-वडिलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला पोटचा गोळा पुन्हा मिळणार आहे का?. या घटनेतून विद्यार्थी व एसटी प्रशासन बोध घेणार आहे का?

तीन फुटांच्या दरवाजातून पाच-पन्नास जणांच्या घोळक्याची घुसखोरी

एस.टी.तील जागा पकडण्यासाठीची जीवघेणी रस्सीखेच जिल्ह्याच्या प्रत्येक बसस्थानकात रोजच पाहायला मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थी अगदी सकाळी 6 वाजल्यापासून शाळा, कॉलेजसाठी शहरात येत असतात. पुन्हा घरी माघारी जाताना लवकर पोहोचण्याची प्रत्येकालाच आस असते. विद्यार्थ्यांची एवढी गर्दी होते की बसमधील जागाही अपुरी पडते. मग सुरू होते ती जीवघेणी चढाओढ. विद्यार्थ्यांचा जथ्था जागा पकडण्यासाठी इरेला पेटतो. त्यातून अघटीत घडू लागले आहे.
जागा पकडण्यासाठी प्रत्येकजण इर्षेने बसमध्ये चढत असतो. त्यामुळे होणारी तुडूंब गर्दी दरवाजाच्या दिशेने धावत असते. एसटीच्या सुमारे तीन फुटाच्या दरवाजातून घुसण्यासाठी पाच-पन्नास जणांचा घोळका एकाचवेळी प्रयत्न करत असतो. एकमेकाला ढकलून, मागे ओढून जीवाच्या आकांताने प्रत्येकजण दरवाजातून आतमध्ये घुसत असतो. त्यातूनच श्रावणीसारखे काही जीव गेले आहेत. ही जीवघेणी चढाओढ थांबणार आहे की नाही? याचे उत्तर कोण देणार?

विभाग नियंत्रक निर्णय घ्या आता..

  • बसमध्ये चढताना होणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल का? विद्यार्थ्यांना शिस्त लागेल का?
  • आलेले प्रवासी उतरल्यानंतरच एसटी फलाटावर लागेल का?
  • विभाग नियंत्रक रोहन पलंगे यावर काय निर्णय घेणार? हे पहावे लागेल.
  • एस.टी फलाटावर लागण्यापूर्वी बसमधून आलेले प्रवासी अगोदरच उतरवणे गरजेचे असते. मात्र, तसे होत नाही. बस थेट फलाटावर नेली जाते. त्यामुळे बसमधून उतरणारे प्रवासी व बसमध्ये घुसण्यासाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी यांच्यात बाका प्रसंग उद्भवतो. अनेकदा उतरणार्‍या शेवटच्या चार ते पाच प्रवाशांना बसमध्ये घुसणारी गर्दी पुन्हा आत घेऊन जाते.
  • वाई बसस्थानकातील दुर्घटना हा काही पहिला अपघात नव्हता. यापूर्वीही अशा घटना घडूनही त्यावर ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. दुर्घटनेच्या चौकशीचा फार्स करून काय उपयोग? घटनेची तीव्रता ओसरली की पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' हे सुरूच. हे कधी थांबणार आहे? एस.टी प्रशासन यावर विचार करणार आहे की नाही?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news