सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा शहरालगत आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन होणार होते. यासाठी उभारलेल्या मंडपाचे खा. उदयनराजे भोसले समर्थकांनी मोडतोड करत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही तेथे जाऊन तळ ठोकला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरालगत आज सकाळी 10 वाजता आ. शिवेंद्रराजे भोसले यांची सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकहाती सत्ता आहे. सध्या ही इमारत सातारा एसटी परिसरात आहे. नव्या इमारतीसाठी शहरालगत खिंडवाडी येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी भूमिपूजनचा कार्यक्रम आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थित होणार आहे.
भूमिपूजन सोहळा व त्यानंतर सभा असे कार्यक्रमाचे स्वरूप ठरले आहे. यासाठी परिसरात मोठा मंडप टाकून सजावट करण्यात आली होती. मात्र आज बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास खा. उदयनराजे भोसले समर्थकांनी या परिसरात येऊन जोरदार राडा केला. मंडपाचे नुकसान करून तो पाडला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे अर्धा तास परिसरात तणाव कायम होता. दरम्यान, या घटनेची माहिती आ. शिवेंद्रराजे भोसले यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हळूहळू आमदार समर्थकांनी परिसरात गर्दी केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस दल अलर्ट झाले व परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. यामुळे आता पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :