उदयनराजे म्हणाले, ‘रयत’चे अध्यक्ष मुख्यमंत्री का नाहीत? - पुढारी

उदयनराजे म्हणाले, ‘रयत’चे अध्यक्ष मुख्यमंत्री का नाहीत?

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : रयत शिक्षण संस्थेची घटना कर्मवारी अण्णांनी केली. संस्थेच्या घटनेनुसार मुख्यमंत्री हेच संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मग, ‘रयत’चे अध्यक्ष मुख्यमंत्री का नाहीत, असा सवाल करत भाजपचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर नेम साधला.

दरम्यान, सातारच्या क्रीडा संकुलाच्या निकृष्ट कामावरून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शेलक्या भाषेत टीकास्त्र सोडले. शनिवारी एकाच दिवसांत दोनवेळा पत्रकार परिषदा घेऊन उदयनराजेंनी दोन्ही पवारांवर आपला निशाणा साधला.

खा. उदयनराजे भोसले यांनी शनिवारी सातार्‍यात दोनदा पत्रकार परिषद घेतली. सकाळी त्यांनी सातारच्या जिल्हा शाहू क्रीडा संकुलावरून अजित पवार यांना लक्ष्य केले. दुपारी खा. उदयनराजेंनी शासकीय विश्रामगृहावर पुन्हा पत्रकार परिषद घेऊन रयत शिक्षण संस्थेचा मुद्दा पुढे करत खा. शरद पवार यांच्यावर नेम साधला.

ते म्हणाले, रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919 मध्ये कर्मवीर अण्णांनी केली. सातारा ही त्यांनी कर्मभूमी निवडली. थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी सातारच्या राजवाड्यात त्या काळात पुरोगामी विचार म्हणून शाळा सुरू केली. सातारच्या राजघराण्याचे मोठे योगदान रयतच्या स्थापनेत आहे. त्यासाठी लागणारे सहकार्य असेल, जमीन असेल, सर्व प्रकारचे सहकार्य दिले. रयत शिक्षण संस्थेची घटना अण्णांनी केली. रयतच्या घटनेतच राज्याचा मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतील, असे म्हटले आहे. अण्णांनी ज्या वेळेस घटना लिहिली त्यावेळी माझाही जन्म झाला नव्हता. असे काय एवढे घडले की,

अण्णांच्या विचाराची फारकत घेण्यात आली. आता तर अध्यक्ष मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच पाहिजेत ना?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तुम्ही रयतची घटना वाचली का? असे विचारले असता, घटना मिळाली तर वाचणार असे उदयनराजे म्हणाले. संस्थेवर मेंबर म्हणून कुणाला व कसे घेतले जाते, हे मला माहिती नाही. अनेकांनी मला बोलून दाखवले की आम्ही या संस्थेसाठी इतके झटलो पण आमच्या कुटुंबातील कोणीही संस्थेवर नाही. बाकीच्यांची तर यादी फार मोठी आहे. आमच्या राजघराण्याचे इतके मोठे योगदान असतानाही आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला रयत शिक्षण संस्थेत सभासद म्हणून मान्यता दिलेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

खा. उदयनराजे म्हणाले, मला कार्यकारणीवर घ्या, असा माझा अट्टाहास नाही. आम्हाला मतदानाचा अधिकार देखील देऊ नका. पण निदान ज्याला आपण कृतज्ञता म्हणतो, ते तरी दाखवा. आमच्या कुटुंबाचे योगदान असूनही ऑनररी मेंबर म्हणूनसुध्दा घेतले नाही. मी विचारणा केल्यावर म्हणाले की आम्हाला बोर्डासमोर ठेवावे लागले. बोर्डाने मान्यता दिली तरच ते करता येईल, असे संस्थेच्या सर्वोच्च पदाधिकार्‍याने सांगितल्याचे उदयनराजे म्हणाले. सध्या ‘रयत’ची व्याख्या बदलली आहे.

ही संस्था रयतेची आहे. कोणा एका खासगी कुटुंबाची नाही. रयतची वाटचाल खाजगीकरणाकडे सुरु आहे. तसे झाले तर वट वृक्ष वठेल आणि त्याला वाळवी लागेल. असे होऊ नये पण, झाले तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे, असेही उदयनराजे म्हणाले.

सकाळी अजित पवार व दुपारी शरद पवार यांच्यावर टीका करण्यामागचे नेमके कारण काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, कोणाचे नाव घेऊन कोणाला मोठं करण्याइतपत एवढा स्वस्त मी नाही, मी उदयनराजे आहे. जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे. चुकीचे करणार्‍याला जोड्याने हाणले पाहिजे. कुणीही असुद्यात. ही काय कोणाची मालमत्ता नाही. ही लोकशाही आहे. प्रत्येकाने लोकशाहीमध्ये निट रहायचं असा इशाराही त्यांनी दिला. कर्मवीरांचे वारसदार रयत शिक्षण संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून मुख्य पदावर कार्यरत आहेत.

त्यांनी या कारभाराविरोधात आवाज उठवला नाही का? या प्रश्‍नावर बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, त्यांनी आवाज उठवला नाही तो त्यांचा प्रश्‍न आहे.त्यांनी बोलायला पाहिजे होते. पदसिध्द अध्यक्ष मुख्यमंत्री होते. ते चुकीचे आहे का? हे त्यांनी सांगावे. सत्ता बदलली म्हणजे तुम्ही काय अध्यक्ष बदलता की काय? यामध्ये राजकारण येणार नाही तर काय होणार? कर्मवीर भाऊराव पाटलांचे नाव सांगता, आम्ही वारस आहोत. मग वारसांचे मत लोकांना कळाले पाहिजे, असेही उदयनराजे म्हणाले.

तुम्ही त्यांना का नकोशे झाला आहात? जिल्हा बँकेत नको, रयतमध्ये नको? उदयनराजे का नकोत? तुमच्याविषयी एवढा आकस का? या प्रश्‍नावर बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, मला पण कळेनासे झाले आहे मी का नको? त्यांनी सांगू द्या माझ्याकडून काय चुकत आहे, का नको मी? सगळ्यांनी म्हटलं पाहिजे कोणी नसलं तरी चालेल पण उदयनराजेच पाहिजेत. बोलायला काय पैसे लागतात का? शेवटी त्यांना नको असलो तरी मी लोकांना हवा आहे, असेही उदयनराजे म्हणाले.

अजित पवारांविषयी बोलताना तुमची जीभ घसरली का? असा थेट प्रश्‍न उदयनराजेंना विचारल्यावर ते म्हणाले, ज्यांना जी भाषा कळते त्या भाषेतच बोललं पाहिजे. कोणीपण असुद्यात जोड्यानेच मारले पाहिजे.बोलताना मी व्यवस्थीत बोललो आहे. यांच्यामुळे लोकांचे खूप वाटोळे झाले आहे. देशोधडीला लोकं लागली आहेत.

सातारच्या जिल्हा बँकेबाबतची मिटींग सातार्‍यातच झाली पाहिजे का? या प्रश्‍नावर बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, कळायला पाहिजेना? आपल्या जिल्ह्याच्या हिताचे निर्णय आपल्या जिल्ह्यातच घेतले पाहिजेत. ते आपल्या जिल्ह्याचे नाव बदलायला कमी करणार नाहीत.

तुम्ही दिवाळीची तयारी करताय तर बाकीचे जिल्हा बँकेची तयारी करताहेत? मागच्या आठ दिवसांपूर्वी तुमची व रामराजेंची बैठक झाली त्यामध्ये निर्णय झाला म्हणून तुम्ही निर्धास्त आहे का? यावर बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, शासकीय विश्रामगृहात मी बसलो होतो ते आले. हाय हॅलो झालं, तिथेच बसलो, ते वयाने ज्येष्ठ आहेत. त्यांनी मला वैचारिक बोध दिला आणि मी तो ऐकला.

‘त्यांचे’ मुस्काड फोडले पाहिजे…

मी जिल्हा क्रीडा संकुलाला कारण नसताना विरोध करतो, असं दाखवणार्‍या व क्रीडा संकुलांचे वाटोळे करणार्‍या आमदार व पालकमंत्र्यांना धारेवर धरले पाहिजे होते. हे कोणी केलं हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांचं नाव घेतलं तरी घाण वास येतो. त्यांचे मुस्काड फोडले पाहिजे, अशा शब्दात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांचा नामोल्‍लेख टाळून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

क्रीडा संकुलाचे सगळं वाटोळे करून टाकलं आहे. त्यावेळी जे पालकमंत्री होते त्यांनी उत्तर द्यावे. प्रत्येकवेळी मी नाही, मी नाही, मी काय केलंय, असे म्हणायचे. यांना ऐन मोक्याची जागा कशी मिळणार? आपण काय व्यापारी संकुलांचे टेंडर काढले नव्हते. टेेंडर हे स्टेडियमचे काढले आणि दुकान गाळे बांधले असल्याचा आरोप खा. उदयनराजे भोसले यांनी केला.

अ‍ॅथलेटिकसाठी राऊंड लागत नाही. आताचे जे काही ट्रॅक आहेत ते नक्की बसतात का? त्याला अबलॉन लागतं, तिथे राऊंडच आहे. साधे तुम्ही रणजी ट्रॉफीच्या मॅच घेवू शकत नाही, तुम्ही अ‍ॅथलेटिकचा इव्हेंन्ट घेवू शकत नाही. अ‍ॅथलेटिक स्पर्धेसाठी राउंड लागत नाही. यांनी संपूर्ण सातार्‍याला झिरो करायचे ठरवले आहे, असेही खा. उदयनराजे म्हणाले.

Back to top button