सातारा : संभूखेड येथील जवानाचे निधन | पुढारी

सातारा : संभूखेड येथील जवानाचे निधन

म्हसवड : पुढारी वृत्तसेवा

माण तालुक्यातील संभूखेड येथील जवान सचिन विश्वनाथ काटे (वय 24) यांचे देशसेवा बजावत असताना निधन झाले. या घटनेमुळे माण तालुक्यासह संभूखेड गावात शोककळा पसरली आहे.

दुष्काळी माण तालुक्यातील संभूखेड येथील शेतकरी विश्वनाथ काटे यांचे दोन्ही सुपुत्र लष्करात भरती होऊन देशसेवा बजावत आहेत. त्यापैकी त्यांच्या एका मुलाला वीरमरण आले. जवान सचिन काटे हे पाच वर्षापूर्वी इंडियन आर्मीमध्ये भरती झाले होते. ते राजस्थान येथे देशसेवा बजावत होते. तर रेवन विश्वनाथ काटे हा लहान भाऊ आसाम येथे देशसेवा बजावत आहे.

दि. 20 ऑक्टोबर रोजी रात्री सचिन काटे हे देशसेवा बजावत असताना त्यांना वीर मरण आल्याची माहिती भाऊ रेवन काटे यांना राजस्थान लष्कराच्या युनिटने दिली. वीर जवान सचिन काटे यांचे पार्थिव पुणे येथील लष्कराचे जवान घेऊन येत असून शनिवार दि. 22 ऑक्टोबर रोजी संभूखेड या जन्म गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.दरम्यान, या घटनेची माहिती समजताच प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार सूर्यकांत येवळे, सपोनि बाजीराव ढेकळे यांनी संभूखेड येथे भेट दिली. जवान सचिन काटे यांचे आई वडिल हे गावी शेती करत आहेत. सचिन काटे यांच्या निधनाच्या वृत्ताने माण तालुक्यासह संभूखेड गावामध्ये शोककळा पसरली.

Back to top button