सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा पालिकेकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. गणेश मंडळांच्या परवान्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सातार्यात पाच ठिकाणी विसर्जन तळी उभारण्यात येत आहेत. गर्दीची शक्यता असल्याने गोडाली गार्डन आणि बुधवार नाका कृत्रिम तळ्यावर फोकस राहणार आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासनाने गणेशोत्सवाचे सूक्ष्म नियोजन केले आहे. सातार्यात गणेशाच्या मोठ्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. अशा मोठ्या मूर्तींसाठी कृत्रिम तळी उभारण्यात येत आहेत. या कृत्रिम तळ्यांची स्वच्छता सुरू झाली आहे. कृत्रिम तळ्यांमध्ये प्लास्टिक कागद अंथरूण त्यामध्ये
पाणी भरून घेण्यात येणार आहे. नगरपालिकेकडून मिरवणूक मार्गावर वीजदिव्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. कृत्रिम तळ्यांवर उजेडासाठी मोठे हॅलोजन बसवण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनाही करण्यात येणार आहे. गणेश मंडळांच्या स्वागतासाठी काही ठिकाणी व्यासपीठ बांधण्यात येणार आहे.
सातार्यात पाच कृत्रिम तळ्यांची गणेश विसर्जनासाठी उभारणी करण्यात येणार आहे. ही तळी पाण्याने काठोकाठ भरून घेण्यात येणार आहेत. गणेशोत्सव काळात या सर्व तळ्यांवर लाईफगार्डची व्यवस्था करण्यात येणार आहे. बुधवार नाका व गोडोली गार्डन कृत्रिम तळ्यावर प्रत्येकी 10, तर इतर तीन ठिकाणी प्रत्येकी पाच लाईफगार्ड असतील.