सातारा : आंबेघर-भोगवली सोसायटीत सचिवाकडून 84 लाखांचा अपहार | पुढारी

सातारा : आंबेघर-भोगवली सोसायटीत सचिवाकडून 84 लाखांचा अपहार

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : आंबेघर भोगवली (ता. जावली) येथील विकास सेवा सोसायटीत 84 लाखांचा अपहार झाला आहे. याप्रकरणी आंबेघर येथील सचिवावर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अजित तुकाराम रांजणे (रा. दापवडी, ता. जावली) असे गुन्हा दाखल झालेल्या सचिवाचे नाव आहे. पदाचा गैरवापर करून सचिवाने आंबेघर भोगवली विकास सेवा सोसायटीत सभासदांच्या नावावर परस्पर कर्ज उचलले. कर्जदारांची दिशाभूल करून चलनाद्वारे कर्जदारांचे पैसे काढून हा गैरव्यवहार झाला आहे. काही सभासदांकडून कर्जाच्या वसुलीचे पैसे घेऊन ते पैसे बँकेत न भरता स्वतः हडप करणे, कर्जदारांना बँकेच्या नसलेल्या वसुलीची चलने देणे तसेच त्यांना कर्ज असताना कर्ज नसल्याचा खोटा दाखला देणे अशा विविध प्रकारे कर्जदारांची एकूण 84 लाख 39 हजार 279 रुपयांची फसवणूक सचिवाने केली आहे.

याप्रकरणी गणेश पोफळे यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सपोनि संतोष तासगावकर तपास करीत आहेत. दरम्यान, करहर बँकेतून हे सर्व व्यवहार झाले असून या बँकेच्या प्रमुख कर्मचार्‍याला हाताशी धरून संबंधित व्यवहार केल्याची चर्चा आहे.

Back to top button