सातारा : पोलिस पत्नीने केला पतीचा ‘गेम’ | पुढारी

सातारा : पोलिस पत्नीने केला पतीचा ‘गेम’

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणार्‍या अमित आप्पासाहेब भोसले (वय 38, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांच्या खुनाचे गूढ उलगडले आहे. हा खून पोलिस असलेल्या त्यांच्या पत्नीने सुपारी देऊन घडवून आणला असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. पतीचे अनैतिक संबंध व वारंवार दिला जाणारा त्रास या कारणामुळे पत्नीनेच गेम केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या खूनप्रकरणी महिला पोलिस पत्नीसह सहा जणांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे.

दि. 24 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्री वाढेफाटा परिसरातील एका हॉटेलसमोर पिस्तुलातून गोळ्या झाडून व गळा चिरून अमित भोसले यांचा खून करण्यात आला होता. त्यांच्या सोबत असलेली मैत्रीण कारमध्ये बसली होती. खुनाचा प्रकार तिच्या समोरच घडला होता. या घटनेने सातारा हादरून गेला. पोलिसांनी दहा दिवसांतच छडा लावून संशयितांना बेड्या ठोकल्या. या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस पत्नी रागिणी अमित भोसले (रा. शुक्रवार पेठ सातारा), अभिषेक विलास चतुर (वय 27, रा. नांदगिरी, ता. कोरेगाव), शुभम हिंदूराव चतुर (27, रा. कोरेगाव, सध्या पुणे), राजू भीमराव पवार (26, रा. पंताचा गोट), सचिन रमेश चव्हाण (22, रा. मुळशी, पुणे), सूरज ज्ञानेश्वर कदम (27, खेड, ता. सातारा, सध्या पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांना दि. 10 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सहा जणांसह आणखी एका अल्पवयीन मुलाचाही यात समावेश आहे.

अमित भोसले यांचा सातार्‍यात वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. अत्यंत निर्घृणपणे त्यांचा खून झाल्यानंतर या प्रकरणी सातारा तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिसांनी तातडीने वाढे फाटा परिसर पिंजून काढून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्यांना संशयितांची चेहरेपट्टी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली होती. मात्र, संशयित हे सातारा, पुणे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, लातूर, अलिबाग, इंदोर, उज्जैन याठिकाणी फिरत असल्याने नेमके लोकेशन मिळण्यास पोलिसांना अडचण येत होती. दरम्यान, या खूनप्रकरणातील काही संशयित हे गोवा राज्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाल्याने त्यांनी भुईंजचे सपोनि रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमून तातडीने कारवाईच्या सूचना केल्या होत्या. मात्र, गर्जेसह पथकाला गोव्यात पोहचण्यास वेळ लागणार असल्याने एसपी समीर शेख यांनी उत्तर गोवा येथील एसपींशी चर्चा करून संशयितांना ताब्यात घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार गोवा पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले व सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर मृत भोसलेंची पत्नी रागिणी भोसले यांनी सुपारी दिल्यानेच खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी रागिणीसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशीला सुरुवात केली. पती अमित याचे विवाहबाह्य संबंध असल्याने तो सतत मारहाण करत असल्यानेच त्याच्या खुनाची सुपारी दिल्याची कबुली रागिणी हिने दिली असून, पुढील तपास सातारा तालुका पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक बापू बांगर, डीवायएसपी मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, विश्वजित घोडके, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, नीलेश काटकर, गणेश कापरे, मोहन पवार, मयुर देशमुख, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे, अनिकेत जाधव, सुशांत कदम व सातारा तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार राजेंद्र वंजारी, दादा परिहार, नितीराज थोरात, सतीश पवार, सचिन पिसाळ, रायसिंग घोरपडे, राहुल राऊत यांनी केली.

रागिणीला गुन्हेगारांची पार्श्वभूमी माहीत होती

संशयित पाच व एक अल्पवयीन अशा सहाही जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी अमित भोसले यांची पत्नी रागिणी भोसले हिलासुद्धा अटक केली. संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असल्यामुळेच रागिणी हिने त्यांना सुपारी दिली असल्याचा अंदाज आहे. मात्र, किती रुपयांची सुपारी दिली? हे मात्र अद्याप समोर आले नाही. सुपारी घेऊन खून करणारी टोळी ही सराईत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Back to top button