सातारा : भाडळेतील दारूअड्डा महिलांकडून उद्ध्वस्त  | पुढारी

सातारा : भाडळेतील दारूअड्डा महिलांकडून उद्ध्वस्त 

पिंपोडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा :  भाडळे, ता. कोरेगाव येथील चौकात वडापाव स्टॉल असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर बुधवारी सायंकाळी चिलेवाडी येथील महिलांनी हल्लाबोल करून दारू अड्डा उद्ध्वस्त केला. मात्र, याबाबत वाठार स्टेशन पोलिसांना कसलीही माहिती नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की,भाडळे येथील चिलेवाडी- भाडळे चौक हे त्या परिसरातील बहुतांश गावांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे नेहमीच ग्रामस्थ व वाहनांची वर्दळ असते. या चौकात वर्षभरापूर्वी एका इसमाने पत्र्याचे शेड उभारुन वडापाव, भजी यासह अन्य खाद्यपदार्थांचा स्टॉल चालू केला होता. या स्टॉलवर चांगलीच वर्दळ वाढू लागली.

या परिसरात कुठेही जवळ सरकारमान्य देशी दारू अथवा परमिट रूम नसल्याने आणि तळीरामांची तहान ओळखून या बहाद्दराने अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री सुरू केली. अल्पावधीत या व्यवसायात त्याचा चांगलाच जम बसला. मात्र, त्यामुळे परिसरातील बहुसंख्य तळीराम या चौकात घुटमळत राहू लागले. येथे अनेकदा वादावादीचे प्रसंग निर्माण झाले. यातूनच परिसरातील महिला वर्गात या अवैध दारु विक्रेत्याबद्दल चीड निर्माण झाली.
दिवसेंदिवस हा व्यवसाय जास्तच बाळसं धरू लागल्याने महिलावर्ग हतबल झाला होता. चिलेवाडी येथील महिलांनी दारू विक्रेत्याविरुद्ध वज्रमूठ आवळली. बुधवारी या महिला थेट स्टॉलवर पोहोचल्या. त्यांचा रणरागिणी अवतार बघून दारू विक्रेता गर्भगळीत झाला. या रणरागिणींनी तेथे असलेल्या दारू बाटल्या फोडून टाकल्या व विक्रेत्याला अक्षरशः कपडे फाटेपर्यंत चोप दिला. या प्रकारामुळे परिसरातील इतर अवैध दारू विक्रेत्यांची मात्र पुरती तंतरली आहे. पुन्हा असा व्यवसाय केल्यास आणखी चोप देऊन थेट जिल्हा पोलीस प्रमुखांनाच बोलावून घेण्याचा इशारा संबंधिताला दिला आहे.

वाठार स्टेशन पोलिसांचे अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष

वाठार स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सत्तेचाळीस गावे येतात.अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे दारू, जुगार, मटका हे धंदे सुरू आहेत. मात्र, पोलीस कायम त्याकडे कानाडोळा करतात. पोलिसांना याबाबत माहिती असूनही असे धंदे चालतातच कसे? असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत आता जिल्हा पोलीस प्रमुखांनीच ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.

Back to top button