सातारा : उड्डाणपूल पाडण्यापूर्वीच महामार्गावर वाहतूक कोलमडली | पुढारी

सातारा : उड्डाणपूल पाडण्यापूर्वीच महामार्गावर वाहतूक कोलमडली

कराड; अशोक मोहने :  कराडजवळ सहापदरीकरणाचे काम सुरू झाले असून कोल्हापूर नाक्यावरील पूल पाडण्यात येणार आहे. या कामामुळे कोल्हापूर, पुणे, सांगलीकडे होणारी वाहतूक विलंबाने होणार आहेच; पण मलकापूर, कृष्णा हॉस्पिटल, आगाशिवनगर व नजीकची गावे, ढेबेवाडी, पाटणवरून कराड शहरात येणारी वाहने याचे नियोजन महामार्ग विभाग कसे लावणार आहे, याबाबत वाहनधारक, नागरिक प्रचंड संभ्रमात आहेत. उड्डाणपूल पाडकामापूर्वीच कराड कोल्हापूर नाक्यावर वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे.

कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. तो जवळपास साडेतीन कि.मी.चा आहे. शिवाय कराड येथे कोयना नदीवरही आणखी एक पूल बांधण्यात येणार आहे. याचे नियोजन युध्द पातळीवर सुरू झाले आहे. त्यासाठी बॅरिकेटिंग करण्यात येत आहे. पहिला पूल महामार्गावर असल्याने कोल्हापूर, कराड, सातारा, पुणे, मुंबई आदी शहराकडे धावणारी बेसुमार वाहने वळवायची कशी आणि त्यांना पर्यायी मार्ग कसा उपलब्ध करून द्यायचा याबाबत युध्दपातळीवर नियोजन सुरू झाले आहे.

दरम्यान कराड शहरात येणारे मलकापूरसह अन्य गावातील वाहनधारक ज्यांचा कराड शहराशी संबंध येतो त्या वाहनधारक, नागरिक व विद्यार्थ्यांची पर्यायी वाहतुकीची व्यवस्था काय याबाबतही तातडीने नियोजन करावे लागणार आहे. पर्यायी वाहतूक व्यवस्थेबाबत महामार्ग विभागाकडून अद्याप कसलीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
बॅरिकेटिंगची कामे सुरू झाल्याने कमालीची वाहतूक कोंडी होवू लागली आहे. प्रत्यक्ष काम सुरू होईल तेव्हा वाहनधारक, नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

गंभीर रुग्ण, अ‍ॅम्ब्यूलन्स जाणार कसे

कोल्हापूर नाका ते कृष्णा हॉस्पिटल दरम्यान अनेक हॉस्पिटल्स आहेत. कृष्णा हॉस्पिटल तर सर्वात मोठे. त्यामुळे गंभीर रुग्ण घेऊन अ‍ॅम्ब्युलन्स सायरन वाजवत सतत सुसाट धावत असते. गंभीर रूग्णांना तातडीने उपचार मिळून त्यांचे जीव वाचवणे महत्वाचे असते.शिवाय सीटीस्कॅन, लॅबमधील चाचण्यासाठी रुग्णाची ने -आण करावी लागते. दोन दिवसापासून कोेल्हापूर नाक्यावरील वाहतूक कोंडीची समस्या पाहिल्यानंतर पोलिसांनाही ती नियंत्रणात आणने शक्य नाही असे दिसते.त्यामुळे रुग्णांच्या जीवाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दुचाकी लावून चालत येण्याची वेळ

कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पूल ते मलकापूर दरम्यान पूल पाडण्यासाठी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. शिवाय अद्याप पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू नाही. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होवू लागली आहे. वाहतुकीचे पूर्ण नियोजन कोलमडले आहे. गुरूवारी सायंकाळी सहा नंतर तर परिस्थिती हाताबाहेर गेली. शंभर मीटर अंतर पार करून शहरात येण्यासाठी अर्धा ते एक तास लागत होता. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलेले मलकापूर, आगाशिवनगर येथील काही दुचाकीस्वार रस्त्याकडेला दुचाकी लावून चालत शहरात आले.

महामार्गावरील पर्यायी वाहतुकीच्या नियोजनाचा प्रस्तावित आराखडा

कराड; पुढारी वृत्तसेवा :  कराड शहरातून कोल्हापूरकडे जाणार्‍या प्रवाशांनी, नागरिकांनी आपली हलकी वाहने मार्केट यार्ड रस्त्याने मलकापूर मार्गे हायवेला जाण्यासाठी बैलबाजार रस्त्याचा वापर करता येऊ शकतो. मलकापूर ते कोल्हापूर नाका यादरम्यान डाव्या बाजूने वाहतूक करणार्‍या येथील स्थानिक नागरिकांनी कोणत्याही स्थितीत यादरम्यानच्या महामार्गावर केलेल्या वळण मार्गातून घुसण्याचा प्रयत्न करू नये. या वाहनधाकर व नागरिकांना पाटण तिकाटने येथे जाऊन पुलाखालून वळून येऊन जूना कोयना पूल अथवा पंकज हॉटेल पासून सर्व्हिस रोडचा वापर करावा लागणार आहे.

कराड शहरातून सातारा बाजूकडे जाणारी हलकी वाहने..

कराड शहरातून सातारा बाजूकडे जाणारी हलकी वाहने कोयना जुना पुलाचा वापर करतील. शिवाय (कारखाना-शिरवडे- तासवडे व मसूर मार्गे) या मार्गावरुन ही जाऊ शकतील. जड वाहने कोल्हापूर नाक्यावरून डाव्या बाजूने सर्व्हिस रस्त्याने महामार्गावर खरेदी विक्री पंपा समोर केलेल्या वळण मार्गामधून सातारा बाजूकडे वळतील. यासाठी महामार्गावर पंपासमोर वळण मार्ग करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातून शहरात येणारी वाहने

कोल्हापूर बाजूकडून व कराड तालुक्यातील ग्रामीण भागातून कराड शहरात प्रवेश करणारी वाहने ही डाव्या सर्विस रस्त्याने पाटण तिकाटणे येथिल पुलाखालून वळून शहरात जातील. यामध्ये हलकी वाहने कोयना पुलावरून तर जड वाहने पूलाखालून पंकज हॉटेल मार्गे सर्व्हिस रस्त्याने जातील.

पूल पाडकामावेळी कोल्हापूर नाक्यावरून शहरात येणारे रस्ते होणार बंद

प्रत्यक्ष पूल पाडण्याचे काम सुरू झाल्यानंतर कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाखाली शहरात येण्यासाठी व शहरातून बाहेर जाण्यासाठी जे दोन मार्ग होते ते पूर्णपणे बंद असणार आहेत. या ठिकाणावरून बाहेर ही जाता येणार नाही व शहरात येता येणार नाही. अक्षता मंगल कार्यालय, नटराज हॉटेल येथून बैलबाजार मार्केट रोडने कराड शहरात जाण्यासाठी व तेथून साईनगर मधून अक्षता कार्यालय, नटराज हॉटेल म्हणजेच हायवेला काही वाहने ये-जा करण्याचा प्रयत्न करतील मात्र हा मार्ग अत्यंत अरूंद रहिवासी क्षेत्रातील असल्याने नागरिकांना नाहक त्रास होणार नाही याची वाहनचालकांनी दखल घेणे गरजेचे आहे.

वाहतूक पोलिसांचे नियोजन..

उड्डाणपूलाचे पाडकाम सूरू झाल्यानंतर वाहनचालकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, या परिसरातून प्रवास करणार्‍या दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा. नियमांचे पालन करावे, वळणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणी वाहने घालू नयेत. नागरिकांनी, प्रवाशांनी तसेच वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत लवकरच पर्यायी वाहतुकीची व्यवस्था आमलात आणण्यात येणार आहे.

उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू झाल्यानंतर सातारा बाजूकडून कोल्हापूर कडे जाणारी सर्व वाहने कराडच्या पंकज हॉटेल समोर केलेल्या वळण मार्गातून महामार्गावरील लेन वरून जातील. पुढे कोयना खरेदी-विक्री खत कारखान्यासमोर केलेल्या वळण मार्गातून वाहने पुढे अक्षता कार्यालयासमोरुन मलकापूर पुलानजीक डाव्या बाजूने सर्व्हिस रोडने पुढे जातील

कोल्हापूर बाजूकडून सातार्‍याकडे जाणारी सर्व वाहने मलकापूर पासून सर्व्हिस रोडवरुन ढेबेवाडी फाटा, नटराज टॉकी अशी सर्व्हिस रोडने पुढे जातील. मात्र यातील काही वाहनांना कराडात प्रवेश करायचा झाल्यास पाटण तिकाटणे येथील उड्डाणपुला खालून वळून यावे लागणार आहे. यामध्ये हलकी वाहने कोयना पुलावरून शहरात जातील तर जड वाहनांना पुलाखालून पंकज हॉटेल मार्गे सर्व्हिस रोडने कराड शहरात जाता येईल.

सहापदरीकरणांतर्गत कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्यासाठीची तयारी, सूरक्षा व्यवस्था सज्ज झाली आहे. पूढील आठवड्यात हा पूल पाडण्याचे काम सुरू होणार आहे. मात्र यामुळे महामार्गावरील येणारी जाणारी वाहतूक कराड जवळ ठीक ठिकाणी वळवण्यात आली आहे. पूल पाडण्यासंदर्भातील अधिकृत सूचना जिल्हा प्रशासन ठेकेदार कंपनीसोबत झालेल्या चर्चेनंतर लवकरच जाहीर करेल, असे समजते.

मलकापूर-नांदलापूर मार्ग ठरणार महत्त्वाचा

कराड; चंद्रजित पाटील :  पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका ते मलकापूरमधील ग्रीनलॅण्ड हॉटेलपर्यंत सुमारे साडेतीन किलोमीटरचा एकच उड्डाणपूल होणार आहे. त्यामुळेच कोल्हापूर नाका परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर कराडमधील मार्केट यार्ड ते मलकापूर आणि तेथून नांदलापूरला जोडणारा मार्ग दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर आठ ते नऊ वर्षापूर्वी मलकापूर – नांदलापूर मार्गास मान्यता मिळाली होती. मलकापूरमधील स्मशानभूमी परिसरापर्यंत मार्गाचे काम होऊन तेथून पुढचे काम स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध यासह अन्य काही कारणांमुळे रखडले होते. मात्र आता हाच मार्ग कराडमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूर नाका ते मलकापूरमधील ग्रीनलॅण्ड हॉटेलपर्यंत उड्डाण पूल पाडले जाणार असल्याने वाठार, उंडाळे परिसरातील कराडकडे येणार्‍या आणि कराडमधून याच बाजूने पाचवड फाट्याकडे जाणार्‍या वाहन चालकांना भेदा चौकातून मार्केट यार्ड मार्गे नांदलापूरकडे जाणारा मार्ग सोईचा ठरणार आहे. मलकापूरमधील स्मशानभूमीपर्यंत हा मार्ग यापूर्वीच पूर्ण झाला आहे. मात्र तेथून पुढे नांदलापूरपर्यंत काम रखडले होते.

मात्र आता या रस्त्याच्या कामाला सुद्धा सुरूवात झाल्याने स्थानिक वाहन चालकांना हा मार्ग दिलासादायक ठरणार आहे. याशिवाय मलकापूर फाटा परिसरात उड्डाण पुलाखालून मोठ्या प्रमाणावर वाहने मलकापूर आणि कृष्णा हॉस्पिटलकडे ये – जा करत असतात. या ठिकाणीही खूप बिकट अवस्था होण्याची चिन्हे आहेत.

मलकापूरमध्ये अपघाताचा धोका
मलकापूर ते नांदलापूर मार्गालगत मलकापूरमध्ये मार्गालगत शाळा आहे. याशिवाय स्टार इंग्लिश मिडियम स्कूल परिसरापासून स्मशानभूमीपर्यंत मार्गालगत मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत आहे. या मार्गावर सध्यस्थितीत वाहनांची गती करण्यासाठी साधा गतीरोधक नाही. त्यामुळे दुचाकीसह बहुतांश वाहने सुसाट असतात. मलकापूरमधून महामार्गास भारती विद्यापीठ मार्गे जोडणारा मार्गही अरूंद आहे. त्यामुळे अपघाताचा धोका आहे.

वेळ गाठण्यासाठी विद्यार्थ्यांची होणार फरफट

कराड; प्रतिभा राजे :  कराड हे विद्येचे माहेरघर आहे. याठिकाणी शासकीय महाविद्यालये तसेच शासकीय अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत असल्याने कडेपूर तालुका, वाळवा तालुका, खानापूर तालुका, शिराळा तालुक्यासह सातार्‍यातून दररोज हजारो विद्यार्थी कराडला शिक्षणासाठी महामंडळाच्या तसेच खासगी बसने ये जा करतात. कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्यात येणार असल्याने पुणे, सातारा व कोल्हापूर व सांगली बाजूने येणार्‍या वाहनांची येथे प्रचंड कोंडी होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये वेळेत पोहोचणे अवघड होणार आहे. जरी पर्यायी मार्गाचा अवलंब केला तरी या मार्गावर वाहनांचा प्रचंड ताण येणार असल्याने विद्यार्थ्यांची कॉलेजला पोहोचण्यासाठी मोठी फरफट होणार आहे.

कराडजवळ काम सुरू झाले आहे. त्यामुळे उड्डाणपूल लवकरच जमीनदोस्त केला जाणार आहे. त्याठिकाणी नवीन सहापदरी पूलाचे काम सुरू होणार आहे. मात्र हे काम पूर्ण व्हायला किमान दिड वर्षाचा कालावधी जाणार आहे. या कालावधीत सध्याच्या पुलावरील वाहतूक वळवण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे. सध्या या पर्यायी मार्गांबाबत नियोजन सुरू आहे. पर्यायी मार्गावरून कराडमध्ये ये जा करण्याचा कालावधी मात्र जास्त असणार आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनांचे संथ गतीने मार्गक्रमण सुरू राहणार असल्याने महाविद्यालयीन युवक, नोकरी व व्यवसाय करणार्‍यांना आपल्या वेळा बदलाव्या लागणार असून घरातून नेहमीच्यावेळेपेक्षा तासभर आधी बाहेर पडावे लागणार आहे.

महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवणार

कराड; अमोलसिंह चव्हाण :  पुणे- बंगळूर आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरण कामास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार कराड व मलकापूरच्या हद्दीत सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा सिंगल पिलर पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या कोल्हापूर नाका व कृष्णा हॉस्पिटल समोर असलेले पूल पाडले जाणार आहेत. पूल पाडण्यासाठी संबंधित कंपनीला तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी कामास गती दिले असून महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे काम सुरू करण्यात आले असून कोल्हापूर नाक्यावरती बॅरिकेट लावले आहेत.

महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी कोल्हापूर नाक्यावरील पुल प्रथम पाडला जाणार आहे. पुल पाडत असताना महामार्गावरील वाहतूक सोयीनुसार सेवा रस्त्यावरून वळवली जाणार आहे. सध्या कोल्हापूर नाक्यावर बॅरिगेट लावून वाहतूक वळवण्यात आली आहे. प्रत्यक्ष पुल पाडण्याच्या कामास सुरुवात झाल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत पोलिसांकडून बदल केले जाणार आहेत. जेणेकरून वाहतूक सुरळीत राहावी. वाहनधारक, प्रवासी, विद्यार्थी व रुग्णालयात जा-ये करणार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, या दृष्टीने पोलीस उपाय योजना करत आहेत.

पूल पाडण्याच्या कामास सुरुवात केल्यानंतर सातारा बाजूकडून कोल्हापूरकडे जाणारी सर्व वाहने कराडच्या पंकज हॉटेलसमोर केलेल्या वळण मार्गातून महामार्गावरील पश्चिम बाजूस असलेल्या दुसर्‍या लेनवर वळवली जाणार आहेत. तर कराडमध्ये येणारी वाहने सेवा रस्त्याने पुढे येऊन गांधी पुतळ्यापासून शहरात येतील. कोल्हापूरकडे जाणारी वाहने पूढे खरेदी-विक्री खत कारखान्यासमोर केलेल्या वळण मार्गातून अक्षता मंगल कार्यालयासमोरुन डाव्या बाजूने सेवा रस्त्यावरून पुढे जातील. तर कोल्हापूर बाजूकडून सातार्‍याकडे जाणारी सर्व वाहने कोयना वसाहतपासून सेवा रस्त्यावरून ढेबेवाडी फाटा, नटराज चित्रमंदिरासमोरून पुढे आनंदराव पाटील यांच्या पेट्रोल पंपापासून पुन्हा महामार्गावर येतील. मात्र, यातील काही वाहनांना कराड शहरात प्रवेश करायचा असल्यास त्यांनी पाटण तिकाटणे (वारुंजी फाटा) येथील उड्डाणपूलाखालून वळून यावे लागणार आहे. यामध्ये हलकी वाहने कोयना जुन्या पुलावरून शहरात प्रवेश करतील. तर जड वाहनांना पंकज हॉटेल मार्गे सेवा रस्त्याने शहरात प्रवेश करता येईल.

कराड शहरातून सातारा बाजूकडे जाणारी हलकी वाहने जुन्या कोयना पुलाचा वापर करतील. शिवाय सह्याद्रि कारखाना, शिरवडे, तासवडे व मसूर मार्गावरुनही वाहने जाऊ शकतात. तर जड वाहने कोल्हापूर नाक्यावरून डाव्या बाजूने सेवा रस्त्याने महामार्गावर खरेदी विक्री पंपासमोर केलेल्या वळणमधून सातारा बाजूकडे वळतील. यासाठी महामार्गावर पंपासमोर वळण मार्ग करण्यात आला आहे.

कोल्हापूर बाजूकडून व कराड तालुक्यातील ग्रामीण भागातून कराड शहरात प्रवेश करणारी वाहने ही डाव्या सेवा रस्त्याने पाटण तिकाटणे येथील पुलाखालून वळून शहरात येतील. यामध्ये हलकी वाहने कोयना पुलावरून, तर जड वाहने पूलाखालून पंकज हॉटेल मार्गे सेवा रस्त्याने जातील. प्रत्यक्ष पुल पाडण्याचे काम सुरू असताना कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाखाली शहरात ये-जा करण्यासाठी असलेले दोन्ही मार्ग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. कराड शहरातून कोल्हापूरकडे जाणार्‍यांना मार्केट यार्ड रस्त्याने मलकापूर मार्गे हायवेला जाण्यासाठी बैलबाजार रस्त्याचा वापर करता येऊ शकतो. मलकापूर ते कोल्हापूर नाका यादरम्यान डाव्या बाजूने वाहतूक करणार्‍या येथील स्थानिक नागरिकांनी कोणत्याही स्थितीत वळण मार्गातून घुसण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी पाटण तिकाटने येथे जाऊन पूलाखालून वळून जूना कोयना पूल अथवा पंकज हॉटेल पासून सेवा रस्त्याचा वापर करावा करायचा आहे.

पूल पाडण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा होणारा वापर

पुढील आठवड्यात प्रत्यक्ष पूल पाडण्याचे काम सूरू होणार आहे. पूल पाडण्यासाठी कसलाही ब्लास्ट करण्यात येणार नसून अत्याधुनिक मशीनचा वापर करून हा पूल पाडण्यात येणार आहे. पूल पडण्याची नेमकी तारीख जिल्हा प्रशासन लवकरच संबंधित कंपनीशी चर्चा केल्यानंतर जाहीर करणार आहे.

16 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वॉच…

मलकापूर ते पंकज हॉटेल या दरम्यान सुरू असलेल्या कामावर व वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी 16 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वॉच असणार आहे. वळण असणार्‍या ठिकाणी मोठे स्पिडब्रेकर असणार आहेत. तर या परिसरात एक अ‍ॅम्बुलन्स व दोन क्रेन यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय वाहतूक सुरळीत राहावी यासाठी कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व संबंधित ठेकेदार कंपनीचे कर्मचारी कायमस्वरूपी थांबणार आहेत.

पूल पाडण्याचे व बांधण्याचे प्रत्यक्ष काम सुरू असताना वाहनधारक, प्रवासी यांनी प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणार्‍या सूचनांचे व नियमांचे पालन करावे. येथील वाहतूक सुरळीत राहावी म्हणून उलट्या दिशेने प्रवास करू नये. वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये. वाहतूक कोंडी होऊन लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
– सरोजिनी पाटील,
सपोनि, कराड शहर वाहतूक शाखा.

Back to top button