सातारा : जिल्ह्यातील पंधरा वर्षांपेक्षा जुनी शासकीय वाहने भंगारात | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील पंधरा वर्षांपेक्षा जुनी शासकीय वाहने भंगारात

सातारा; प्रविण शिंगटे :  वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत १५ वर्षांहून अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व महामंडळाकडे असणारी वाहने भंगारात जाणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १९० हून अधिक वाहने भंगारात जाणार हे आता स्पष्ट झाले आहे.

शासन जुन्या वाहनांचा वापर बंद करण्याबाबत सातत्याने निर्णय घेत असून, त्या दिशेने शासनाचे काम सुरू आहे. त्यामुळे १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने आता वाहनचालकांना रस्त्यावर घेऊन फिरता येणार नाही. सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत जिल्ह्यात १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने असलेल्या वाहनांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात सुमारे १९० हून अधिक वाहने १५ वर्षांपेक्षा जुनी आहेत. या वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयामार्फत परिवहन विभागाकडे पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १९० हून अधिक वाहने १ एप्रिलपासून भंगारात जाणार आहेत हे आता स्पष्ट झाले आहे.

शासकीय कार्यालयात जुन्या वाहनांमुळे बकाल स्वरूप

  • सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग यासह अन्य विभागात १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने निर्लेखीत करण्यात आली आहेत.
  •  ही वाहने धूळखात व सडत पडली आहेत. अस्ताव्यस्तपणे वाहने उभी असल्याने कार्यालय परिसराला बकाल स्वरूप आले आहे.

Back to top button