सातारा : एका रात्रीत 17 घरे फोडली; 'या' पाच गावांमध्ये असुरक्षेचे वातावरण | पुढारी

सातारा : एका रात्रीत 17 घरे फोडली; 'या' पाच गावांमध्ये असुरक्षेचे वातावरण

नागठाणे; पुढारी वृत्तसेवा : बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांडवे, निनाम, कुसवडे, धनवडेवाडी, वेचले या गावांत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंद घरे फोडून डल्ला मारला. चोरट्यांनी परिसरातील तब्बल 17 बंद घरे टार्गेट केली. या घटनेने परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, चोरट्यांनी मांडवे गावातील 6 बंद घरे हेरून डाव साधला. कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. सापडेल तो ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. निनाम येथील 3 घरेही फोडली. तसेच कुसवडे, धनवडेवाडी या गावांतील बंद घरे शोधून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. एकूण17 घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला. या घटनेमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.
या परिसरात वारंवार घरफोड्या होत आहे. वाढत्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पोलिसांनी रात्र गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

तक्रारदार परगावी; ठसेतज्ज्ञांना पाचारण

चोरीच्या या घटना शुक्रवारी समोर आल्यानंतर बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून ठसेतज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी शुक्रवारी पंचनामा करण्यास सुरुवात केल्यानंतर कुसवडे व धनवडेवाडी या गावांतील घरातून रोख रक्कम व दागिने या चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती मिळाली आहे. अनेक तक्रारदार परगावी असल्याने त्यांना माहिती दिली असून सर्व पंचनामा प्रक्रिया झाल्यानंतर नेमका किती मुद्देमाल गेला? हे समोर येईल.

Back to top button