वडूज/खटाव ; पुढारी वृत्तसेवा : वडूज पोलिस स्टेशनच्या 6 हजार वर्ग फूट जागेतील इमारत, बगिच्या आणि अंतर्गत फर्निचरसाठी तीन कोटी खर्च करण्यात आले आहेत. प्रति चौरस फुटासाठी आलेला 5 हजारांचा खर्च जास्त झाला असून कामही दर्जेदार झालेले नाही. इमारतींची कामे दर्जेदार असतील तरच यापुढे मला उद्घाटनाला बोलवत जा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी पोलिस दलावर झोड उठवली. दरम्यान, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक असलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.
वडूज पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, कोल्हापूर महापरिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंग, पोलिस अधिक्षक, जि. प. अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, रणजित देशमुख आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पधाधिकारी उपस्थित होते.
ना. अजित पवार म्हणाले, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून सामान्य जनतेला त्रास होता कामा नये. त्यासाठी संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करणे गरजेचे आहे. गुन्हेगारीतून येणारा पैसा आणि पैसेवाल्यांना कायद्याचा हिसका दाखवताना पोलिसांनी राजकीय हस्तक्षेपाला थारा देवू नये. अद्यावत प्रशिक्षण, ग्राम सुरक्षा दलाची बळकटी, पोलिस मित्र संकल्पना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आगामी पोलिस भरती पारदर्शकपणे केली जाईल. बलात्कारा सारख्या घटना चिंताजनक असून पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठी सतर्क रहावे, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातारा जिल्ह्यावर नेहमीच प्रेम राहिले आहे. दादांनी या भागातील पाणी योजनांना प्राधान्य देऊन निधी दिला आहे.
गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई म्हणाले, राज्यातील पोलिस ठाणे व वसाहतीची इमारतीची परिस्थिती खूप बिकट आहे. कोरोना काळातील पोलिसांनी जमा केलेली दंडाची रक्कम ही नगरपंचायत, नगरपालिका व महानगर पालिका यांच्याकडे सुपूर्त केली. त्या जमा झालेल्या दंडातील 50 टक्के रक्कम पोलिस विभागाला मिळावी, अशी मागणी ना. देसाई यांनी केली.
यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोर्हाडे, डीवायएसपी डॉ.निलेश देशमुख, सपोनि मालोजीराव देशमुख, दादासाहेब गोडसे, पृथ्वीराज गोडसे, विपुल गोडसे, सचिन माळी, राजेंद्र चव्हाण, विजय गोडसे, युवराज पाटील आदींची उपस्थिती होती. प्रास्तविक पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले.