सातारा : मुख्यमंत्री दौऱ्यावेळी तराफा सेवेवर येतोय ताण | पुढारी

सातारा : मुख्यमंत्री दौऱ्यावेळी तराफा सेवेवर येतोय ताण

बामणोली : पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाकडील दौऱ्यावेळी बार्ज सेवेवर ताण येत असून अशा दौऱ्यावेळी अन्य पर्यायी मार्गांचाही वापर व्हावा, अशी मागणी होत आहे.

मुख्यमंत्री त्यांच्या गावी दरे तांब येथे ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांच्या व अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा मोठा असतो. अशा वेळी हा ताफा रवाना होईतोवर इतर प्रवासी वाहने व नागरिकांचा खोळंबा होतो. त्यांना ३-३ तास तिष्ठत बसावे लागते. या ताफ्यासाठी बोटी व तापोळा, गाढवली, केळघर तर्फ सोळशी या तीन ठिकाणच्या तराफा (बार्ज बोट) सेवेचा वापर केला जातो. मुख्यमंत्री तसेच अधिकारी वर्ग, आवश्यक पोलिस बंदोबस्त त्यांची सर्व वाहने ही तराफामधून दरे येथे नेली जातात. यात बराच वेळ जातो. यामुळे अन्य प्रवासी वाहने व प्रवाशांना तिष्ठत बसावे लागते.

जिल्हा प्रशासनाने जर का ठराविकच वाहने ही तराफ्यामधून नेली आणि बाकीची वाहने बामणोलीत पार्क केली व दरे येथे जाण्यासाठी जिल्हा परिषद सर्व्हिस लाँच, वनविभागाची बोट वापरली तर वेळही कमी लागून तराफा सेवेवरील ताण कमी होऊ शकतो. यामुळे प्रवासी वाहने व प्रवाशांना तिष्ठत बसावे लागणार नाही.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, एस. पी. समीर शेख, जि. प. सीईओ खिलारी यांनी परवाच्या मुख्यमंत्री दौऱ्यावेळी बामणोली ते दरे प्रवास बोटीतूनच केला. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागले नाही. उलट कमी वेळेत त्यांना दरेत पोहोचता आले. त्यांनी आपली वाहने बामणोलीत पार्क केली होती. मुख्यमंत्री दौऱ्यावेळी स्पीड बोट अॅम्बुलन्स बामणोली परिसरात सतर्क ठेवण्याची गरज आहे. जेणेकरून सर्वांच्या आरोग्य सेवेची काळजी त्यामुळे घेतली जाईल.

Back to top button