सातारा : शेंदुरजणे येथे उपसरपंच, मुलाला जबर मारहाण | पुढारी

सातारा : शेंदुरजणे येथे उपसरपंच, मुलाला जबर मारहाण

वाई : पुढारी वृत्तसेवा : शेंदुरजणे (ता. वाई) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत उपसरपंच व त्यांचा मुलगा हे दोघेजण गंभीर जखमी झाले. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

याबाबत माहिती अशी, गावातील विकासकामांबाबतची देविदास जगताप व इतरांनी माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता. यावरून शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच जयसिंग जगताप व देविदास जगताप यांच्यामध्ये वादावादी व धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर वाई पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.

दुपारी देविदास जगताप व इतरांनी या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी गजाने जयसिंग व त्यांचा मुलगा प्रवीण जगताप यांना मारहाण केली. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वाई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबतची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रुग्णालय व पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत तक्रार घेण्याचे काम सुरू होते.

Back to top button