मेडिकल कॉलेजसाठी ४५ इमारती पाडणारे कार्यकर्ते कुणाचे होते? : आ. महेश शिंदे | पुढारी

मेडिकल कॉलेजसाठी ४५ इमारती पाडणारे कार्यकर्ते कुणाचे होते? : आ. महेश शिंदे

सातारा : पुढारी वृत्तसेवा : मेडिकल कॉलेजसंदर्भातील भंगार चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. आमची त्याला ना नाही. मात्र, ४५ इमारती पाडणारे कार्यकर्ते कुणाचे होते याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी टिका आ. महेश शिंदे यांनी केली आहे.

मेडिकल कॉलेज भंगार चोरीबाबत विचारले असता आ. महेश शिंदे म्हणाले, याप्रकरणी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. मात्र, मेडिकल कॉलेजचे काम थांबता कामा नये. पाटबंधारेच्या इमारतींच्या ८ निर्लेखनाचे आदेश होते. मात्र, ४५ इमारती पाडल्या गेल्या. यामध्ये कुणाचे कार्यकर्ते होते, हे अभ्यासायला हवे. संबंधित ठेकेदार कंपनीने बांधकामाआड येणारी एखादी इमारत पाडली असेल तर त्याची चौकशी करु शकता. पण काम सुरु रहायला हवे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या विकासाच्या निर्णय प्रक्रियेत तुम्हाला विचारात घेतले जात नसल्याची चर्चा आहे, असे विचारले असता आ. महेश शिंदे म्हणाले, मागील सरकारच्या काळात विचारात घेतले जात नव्हते. आता सर्व व्यवस्थित सुरु आहे. मतदारसंघातील ताकदीने कामे होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी विचारले असता आ. महेश शिंदे म्हणाले, हा विषय योग्य व्यासपीठावर घेतला आहे. शिक्षणमंत्र्यांनी याप्रकणी स्वत: खात्री केली आहे. व्याप्ती मोठी असल्यामुळे राज्यस्तरीय समितीकडून चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button