बेळगाव आगाराची एसटी बस पोलिस संरक्षणात कुडाळ आगारात! | पुढारी

बेळगाव आगाराची एसटी बस पोलिस संरक्षणात कुडाळ आगारात!

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटल्यानंतर बेळगाव डेपोची बस कुडाळ एसटी आगारात उभी करून ठेवण्यात आली आहे. या आगारात जिल्हा पोलिस प्रशासनाकडून दंगल नियंत्रण पथक तैनात केले आहे. या सीमावादात बेळगावसह कर्नाटकात महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांवर कन्नड संघटनांकडून हल्ले करण्यात आल्याने, एसटी महामंडळाने बेळगावला जाणाऱ्या एस.टी. बसेस तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कुडाळ आगारातून सुटणारी बेळगाव बसफेरी गुरुवारपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार असून विजापूर बसफेरी मिरजपर्यंतच सोडली जाणार असल्याची माहिती कुडाळ आगार प्रशासनाकडून देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांबाबत अन्यायकारक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांना, मराठी भाषीकांना भेटण्यासही विरोध करण्यात आला आहे. त्यातच कर्नाटक राज्यात बेळगाव व अन्य भागात कन्नड संघटनांकडून महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्याचे महाराष्ट्रात गेले दोन दिवस तीव्र पडसाद उमटत असून अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथेही तीव्र पडसाद उमटले. कुडाळ एस.टी. आगारात मंगळवारी सायंकाळी आलेल्या बेळगाव डेपोच्या बसला मनसैनिकांनी काळे फासत जय महाराष्ट्र, जय मनसे, मराठी अशी अक्षरे रेखाटून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला.

परिस्थिती न सुधारल्यास कर्नाटक पासिंग गाड्या जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही मनसैनिकांनी यावेळी दिला. बेळगाव डेपोची बेळगाव – कुडाळ ही वस्तीची बसफेरी बुधवारी सकाळी कुडाळहून बेळगावला मार्गस्थ झालेली नाही. ही बस कुडाळ डेपोतच उभी करून ठेवण्यात आली आहे. कुडाळ पोलिसांनी डेपोत जाऊन या बसवर घडलेल्या प्रकरणाचा पंचनामा केला. तसेच तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून दंगल नियंत्रण पथक डेपोत तैनात करण्यात आले आहे.

दरम्यान, वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार कुडाळ एस.टी. आगारातून बुधवारी सकाळी सोडण्यात आलेली बेळगाव बसफेरी बेळगाव पर्यंत न सोडता, महाराष्ट्र व बेळगाव जिल्ह्याची सीमा शिनोळी येथून मागे वळविण्यात आली. तर गुरुवारपासून कुडाळ आगाराची सकाळची बसफेरी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे. या आगारातून सकाळी व सायंकाळी सोडण्यात येणारी विजापूर बसफेरी विजापूरपर्यंत न नेता, मिरजपर्यंतच सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ एस.टी. आगार प्रशासनाकडून देण्यात आली

Back to top button