सातारा : वाठार स्टेशन परिसरात घरफोड्यांचे सत्र | पुढारी

सातारा : वाठार स्टेशन परिसरात घरफोड्यांचे सत्र

पिंपोडे बुद्रुक; कमलाकर खराडे :  वाठार स्टेशनसह परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सातत्याने घरफोड्या सुरू आहेत. बंद घरे चोरट्यांच्या रडारवर असून, अगदी शेळ्या-बोकडसुद्धा चोरीला जाऊ लागल्याने वाडीवस्तीवर राहणारा सामान्य शेतकरी धास्तावला आहे. वाठार पोलिस ठाण्याचे कारभारी मात्र कार्यालयातून बाहेर पडायला तयार नाहीत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

वाठार स्टेशन पोलिस ठाण्याला ४७ गावांचे कार्यक्षेत्र आहे. तीन घाटरस्ते आणि कमी वर्दळ असणारा काही ग्रामीण भागाचा यात समावेश आहे. डोंगराकडेला वसलेली गावं ही कायमच बाजारपेठांपासून लांब असलेली पाहायला मिळतात. अशा छोट्या-छोट्या गावांमध्ये सध्या सातत्याने घरफोड्या सुरू आहेत. यातील काही पोलिसांच्या रेकॉर्डवर येतात तर काही पोलिसांचा जाच नको म्हणून दाखलच होत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.

गेल्या काही दिवसांत बंद घरे फोडण्याचा सपाटा लावला असून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. मात्र, त्याचा तपास लागू शकला नाही. यावरून वाठार स्टेशन पोलिसांची कार्यक्षमता लक्षात येते. सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ऐवज चोरी होणे ही बाब नवीन नाही. मात्र, चोरट्यांनी चोरांनी आता शेळ्या बोकडसुद्धा उचलायला सुरुवात केली आहे. नलवडेवाडी येथील शेतकऱ्याच्या जवळपास १७ शेळ्या रात्रीत चोरीला गेल्या. तर पिंपोडे बुद्रुक येथील रस्त्याकडेला असलेल्या गोठ्यातील दोन बोकड सुद्धा चोरीला गेले आहेत. पोलिसांबद्दलची भीती चोरांच्या मनात राहिलेली नाही हे यावरून अधोरेखित होते. यावरून वाठार स्टेशन पोलिस किती ग्राऊंडवर काम करतात हे लक्षात येते. पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांचा चेहरा ४७ गावांतील किती लोकांना माहिती आहे हा तर संशोधनाचा विषय होऊ शकतो. अवैध धंद्याची पाळेमुळे इतकी खोलवर रुजली आहेत. की त्याच्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनाच आता लक्ष घालावे लागणार की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांचा संवेदनशील काळ सुरू आहे. यातच चोरट्यांनी धुडगूस घातल्याने कारभारी आता तरी बाहेर पडा, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Back to top button