सातार : बेलवडे हवेली येथे आगीत तीन घरे खाक | पुढारी

सातार : बेलवडे हवेली येथे आगीत तीन घरे खाक

तासवडे टोलनाका : पुढारी वृत्तसेवा : बेलवडे हवेली (ता. कराड) येथे सोमवारी सायंकाळी लागलेल्या आगीत मोलमजुरी करणाऱ्या तीन मजुरांची घरे संसारोपयोगी साहित्यासह जळून खाक झाली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. आप्पा बाबा जाधव, तानाजी किसन गुजले, गणेश लक्ष्मण चव्हाण (सर्व रा. बेलवडे हवेली) अशी घरे जळालेल्या मजुरांची नावे आहेत. या घटनेत मजुरांचे संसार उघड्यावर आले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बेलवडे हवेली येथे माध्यमिक विद्यालय जवळ आप्पा बाबा जाधव, तानाजी किसन गुजले गणेश लक्ष्मण चव्हाण हे मोलमजुरी करणारे मजूर अनेक वर्षापासून राहत आहेत. नेहमीप्रमाणे ते सर्वजण आज कामावर गेले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी शाळा सुटल्यामुळे घरी जात होते. त्यावेळी या विद्यार्थ्यांना घरातून आग आणि धूर ये असल्याचे दिसले.

विद्यार्थ्यांनी तात्काळ बेलवडे हवेली येथील ग्रामस्थांना मजुरांच्या घरांना आग लागल्याची माहिती दिली. बेलवडे हवेलीतील ग्रामस्थ घटनास्थळी येईपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. आगीची माहिती मिळताच मोलमजुरी करणारे मजुरही त्या ठिकाणी धावत आले. आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीने मजुरांच्या तिन्ही घरांना आपल्या कवेत घेतले होते. मोठ्या प्रमाणात आग भडकल्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या मजुरांची कपडे, ज्वारी, दागिने, फ्रीज, पलंग, पैसे, सोने, टीव्ही सर्वकाही जळून खाक झाले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. परंतु मोठ्या प्रमाणात आग पसरली होती.

बेलवडे हवेलीतील ग्रामस्थांनी तळबीड पोलिस व कराड नगरपालिकेतील अग्निशामक दलाशी संपर्क साधला. आगीची माहिती मिळताच तात्काळ तळबीड पोलिस ठाण्याचे कर्मचारी व अग्निशामक दलाचीगाडी घटनास्थळी दाखल झाली. यावेळी तब्बल दोन तासानंतर आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले. तोपर्यंत तिन्ही मजुरांचे संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले होते. यावेळी मोलमजूरी करणाऱ्या मजुरांचा आक्रोश काळीज पिटाळून टाकत होता. रात्री उशिरापर्यंत आगीचे कारण स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान या आगीत मजुरांचे संसार उघड्यावर पडल्याने त्यांना मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

पोटाला चिमटा काढून साठवलेली पुंजी जळाली

तिन्ही मजुरांच्या लहान मुलांनी शिक्षणासाठी छोट्याशा प्लास्टिक बॉक्समध्ये थोडे थोडे पैसे साठवले होते. तसेच मजुरांच्या महिलांनी पोटाला चिमटा घेऊन आपल्या संसारासाठी पैसे साठवले होते. बचत गट तयार केला होता. आगीमध्ये लहान मुलांचे व बचत गटाचे पैसेही जळू खाक झाले आहेत. शासनाने या कुटुंबांना भरीव मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

Back to top button